Breaking News

साथी हाथ बढाना

उमटे धरणातील गाळ उपसण्याची मोहीम सुरू

अलिबाग : प्रतिनिधी

तालुक्यातील सुमारे 70 गावे आणि वाड्यांना पाणीपुरवठा करणारे उमटे धरण गाळणे भरले आहे. धरण परिसरातील 18 गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन या धरणातील गाळ उपसण्याची मोहीम हाती घेतली आहे.

1980 साली उमटे धारण बांधण्यात आले. धरणाची साठवण क्षमता 87 दशलक्ष घनफूट असून पाण्याची शेवटची पातळी 40 मीटर, धरणाची उंची 56.40 मीटर आहे. सद्यस्थितीत धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने पाणीसाठवण क्षमता सुमारे 25 ते 30 दशलक्ष घनफूट कमी झाली आहे. या धरणातून सुमारे दीड लाख लोकांची तहान भागवण्याची क्षमता आहे. मात्र आजघडीला धरणाला भेगा पडल्या आहेत. धरणात गुरांचे शेण व मलमूत्र तसेच मोठ्या प्रमाणावर शेवाळ व केरकचरा साठला असल्याने सभोवतालच्या गावांना दुषीत पाणीपुरवठा होत आहे. परिणामी विविध आजार, रोगराई पसरत असून ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

आतापर्यंत या धरणातील गाळ एकदाही उपसण्यात आला नव्हता. त्यामुळे धरणाची पाणीसाठवण क्षमता कमी झाली आहे. त्याबाबत या परिसरातील तरूणांनी एकत्र येऊन जनजागृती केली आणि ग्रामस्थांना गाळ उपसण्याच्या कामासाठी प्रवृत्त केले. त्यामुळे शेकडो ग्रामस्थ या मोहिमेत श्रमदान करीत आहेत. दरम्यान, उमटे धरणाकडे दुर्लक्ष होत असून, जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचा गलथान कारभार याला जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गरज ओळखून लवकरात लवकर यांत्रिकी पद्धतीने गाळउपसा करण्यात यावा व धरणाची पाणीसाठवण क्षमता वाढवून ग्रामस्थांची तहान भागवावी, जलशुद्धीकरण प्रकल्प उभारावा, अशी मागणी आगरी समाज तसेच नवतरुण मंडळाने केली आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply