Breaking News

एलईडी मासेमारी छोट्या मच्छिमारांच्या मुळावर

कोकणाला 720 किलोमीटरचा विशाल सागरी किनारा लाभला आहे. या विशाल अशा सागरी किनार्‍यावर मासेमारी करणार्‍या कोळी समाजाची वस्ती आहे. सध्या खोल समुद्रात मासेमारी करताना माशांची आवक घटल्याचे निदर्शनास येत आहे. शासनाच्या गस्ती नौका या 12 नॉटिकल क्षेत्राच्या बाहेर जाऊ शकत नाही. याचा मोठ्या होड्या असणारे मच्छिमार फायदा घेत आहेत. ते एलईडी व पर्सेसीन नेटच्या साह्याने खोल समुद्रात मासेमारी करीत असल्याने स्थानिक मच्छिमारांना मासळी मिळत नसल्याने आज शेकडोच्या संख्येने बोटी किनार्‍यावर लागलेल्या दिसून येत आहेत. लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाल्याने स्थानिक मच्छिमार संतप्त झाले आहेत. स्थानिक मच्छिमार खोल समुद्रात जाऊन आठ-आठ दिवस मासेमारी करूनसुद्धा मासळी मिळत नसल्याने ते बेजार झाले आहेत. राज्य शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे एलईडी व

पर्सीनेट मासेमारी बिनदिक्कत चालू आहे. याबाबत शासनाने कठोर पावले उचलावे, अशी मच्छिमारांची अपेक्षा आहे.

मुरूड तालुक्यात 1100 होड्या असून, विविध बंदर किनारी बोटी साकारून ठेवण्यात आलेल्या आहेत. खोल समुद्रात जाऊन मासळीच मिळत नसल्याने त्यापेक्षा होड्या किनार्‍याला लावलेल्या बर्‍या अशीच स्थानिक कोळी बांधवांनी भूमिका घेतल्याचे दिसून येते.अवकाळी पावसानंतर मच्छिमारांवर आता हे संकट कोसळल्यामुळे स्थानिक मच्छिमार खूप त्रस्त झाल्याचे पहावयास मिळत आहे.

रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारी असणार्‍या तालुक्यांना मासळीची आवक घटल्याने मोठा परिणाम सहन करावा लागत आहे.सध्या बाजारात मासळीच कमी येत असल्याने ग्राहकांना मोठी किंमत मोजून मासळी खरेदी करावी लागत आहे. मुरूड तालुक्यातही मासळीच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये नाराजी आहे.

मासळीची आवक घटल्याचे कारण खोल समुद्रात मासेमारी करताना एलईडी व पर्सीनेटचा वापर केल्याने समुद्रात असणारी सर्व मासळी ही एकाच होडीला मिळत असल्याने इतर मच्छिमारांना मासळी मिळेनाशी झाल्याने असंख्य लोकांना पुरेशी मासळी मिळत नसल्याने रायगड जिल्ह्यात सूर ऐकू येत आहे. शासनाकडून एलईडी मासेमारीवर निर्बंध असतानाही खोल समुद्रात ही मासेमारी केली जात असल्याची ओरड मच्छिमारांकडून केली जात आहे. समुद्रात असणारी सर्व मासळी एलईडी मच्छिमारांनाच मिळत असल्याने इतरांना मात्र खाली हाताने परतावे लागत असल्याने बाजारात मासळीची आवक घटल्याचे निदर्शनास येत आहे. वादळी वारे नसतानासुद्धा मासळीची आवक अचानक घटल्याने स्थानिक तसेच पर्यटकांना खूप मोठी किंमत मोजून मासळी विकत घेताना पहावयास मिळत आहे. अचानक पणे अशी परिस्थिती उद्भवल्याने  ग्राहकांप्रमाणेच स्थानिक मच्छिमारसुद्धा हवालदिल झाले आहेत. पूर्वीपेक्षा दुप्पट दराने मासे खरेदी करावे लागत असल्याने स्थानिक ग्राहक मासळी बाजारात चक्कर मारून किमतीमुळे मासे खरेदी न करता दुसरा पर्याय निवडताना दिसत आहे.

मटण सध्या 600 रुपये किलो तर चिकन 110 रुपये किलोने विकले जात आहे, परंतु सध्या चिकनबद्दल अफवा उठल्याने लोक चिकन खाण्याकडे पाठ फिरवित आहेत. चीनमधील कोरोना विषाणूचा संबंध चिकनशी लावण्यात आल्याने चिकनच्यासुद्धा विक्रीत घट आल्याचे निदर्शनास येत आहे. मटणाचे भाव वाढल्याने सामान्य नागरिक खरेदी करण्यास जात नाही. त्यामुळे एकमेव पर्याय मासळी असताना याचे भाव वाढल्याने लोकांचा आता शाकाहारी भोजनाकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे. एकमेव पर्याय मासळीचा असतानासुद्धा मासळी बाजारात महाग झाल्याने सामान्य नागरिक व पर्यटक त्रस्त झाले आहेत.

याबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने सागरकन्या मच्छिमार सोसायटीचे उपाध्यक्ष मनोहर मकू यांना या बदललेल्या परिस्थितीबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, मासळीची आवक घटण्याचे कारण एलईडी मासेमारी व पर्सीनेटद्वारे मासेमारी. अशा प्रकारे केल्याने मोठ्या प्रमाणात मासळी एकालाच मिळत आहे.

शासनाकडून एलईडी मासेमारीला बंदी केली आहे, परंतु शासनाचे अधिकारी हे 12 नॉटीकल क्षेत्रापेक्षा जास्त भागात पोहोचत नाही. अशी मासेमारी खूप खोल समुद्रात होत आहे. खोल भागात शासनाचे अधिकारी पोहोचत नसल्याने एलईडी मासेमारी करण्याचे चांगलेच फावते, परंतु स्थानिक मच्छिमारांना मात्र मासळी मिळत नसल्याने सध्या बाजारात मासळीची आवक घटली असल्याने मासळीचे दर वाढले असल्याचे मकू यांनी सांगितले.

मासळी आवक घटल्याने लोकांना खूप महाग किमतीती मासळी खरेदी करावी लागत आहे.त्यामुळे खानावळीत व हॉटेलमध्ये मासळी थाळीसुद्धा महाग झाल्याचे दिसत आहे. मासळीची किंमत दुपटीने वाढल्याने ग्राहकवर्ग नाराज झाला असून, सर्वसामान्य व मध्यम वर्गाला मासळी विकत घेता येत नाही. आवाक्याबाहेर किमती गेल्याने मासळी विकत घेणे आता कठीण बाब झाली आहे.

मासळीचे दर (सध्याच्या बाजारात सुरू असलेला हा दरतक्ता)

सुरमई एक नग    पूर्वीची किंमत      सध्याची किंमत 

                                400 रुपये               800 रुपये

पापलेट सहा नग  पूर्वीची किंमत      सध्याची किंमत

                                500 रुपये               1000 रुपये

हलवा                     पूर्वीची किंमत      सध्याची किंमत

                                300 रुपये               600 रुपये

रावस मोठी साईज               पूर्वीची किंमत      सध्याची किंमत

                                600 रुपये               1200 रुपयांच्यावर

* महत्त्वाच्या मासळीच्या किमतीत दुपटीने वाढ झाल्याने स्थानिक व पर्यटकांना ही मासळी खरेदी करणे खूप जड जात आहे.

-संजय करडे, खबरबात

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply