पनवेल : बातमीदार
उरण येथील नेव्हल परिसरात बिबट्याचा वावर दिसून आला असून जेट्टीनजीक बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत. यामुळे वनविभाग आणि नेव्ही यांची या परिसरातील संयुक्त गस्त सुरू करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी उरण शहरालगत असलेल्या नेव्हल परिसरात जेट्टीलगत गस्त घालत असलेल्या कर्मचार्यांना बिबट्या दिसून आल्याने खळबळ उडाली आहे. 5 मार्च रोजी रात्रीच्या वेळेस गस्त घालत असताना नेव्हल परिसरात असलेल्या चुनाभट्टीपासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या जुन्या पीआयएम जेट्टीनजीक दिसून आलेल्या बिबट्याची माहिती वरिष्ठ अधिकार्यांना देण्यात आली. त्यानंतर नेव्हल विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी संपूर्ण परिसरात सतर्कता राखण्याचे आवाहन केले असून यासंबंधीची माहिती उरणच्या वनविभागालासुद्धा देण्यात आली आहे.
वन विभागाने घटनास्थळाची पाहणी केली असून जेट्टीनजीक बिबट्याच्या पावलांचे ठसे गोळा करण्यात आल्याचे वन अधिकारी अजय कदम यांनी सांगितले. दीड
महिन्यापूर्वीदेखील नेव्हीच्या परिसरातील दक्षिणेकडील बाजूस असलेल्या बोरी गावानजीकच्या डेपो विभागात बिबट्या दिसून आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तेव्हा आसपासच्या गावकर्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, तर नेव्ही परिसरात कामाला जाणार्या कामगारांनाही एकत्र जाण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आता पुन्हा एकदा स्थानिक रहिवासी आणि कामगारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पीआयएम जेट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात खारफुटी असल्याने बिबट्याला लपण्यासाठी मुबलक जागा असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. नेव्हल परिसरात दिसून आलेल्या या बिबट्यामुळे आसपासच्या मोरा, हनुमान कोळीवाडा, बोरी, केगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
-हिंस्र प्राण्यांची भीती कायम
सुमारे 30 वर्षांपूर्वी याच पीआयएम परिसरात पट्टेरी वाघाने एका कर्मचार्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात कर्मचार्याचा मृत्यू झाला होता. त्या वेळी नरभक्षक झालेल्या या वाघाला पकडण्यासाठी पिंजरा लावून वाघाला गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. नऊ वर्षांपूर्वी मे 2011मध्ये उरण शहरालगत असलेल्या करंजा गावात शिरलेल्या बिबट्याने सहा ते सात गावकरी आणि प्राणीमित्रांना जखमी केले होते. गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये उरण तालुक्यातील आवरे, चिर्ले गावठाण, जांभूळपाडा, रानसई, बोरी, म्हातवली परिसरात बिबट्या दिसून आल्याचे गावकर्यांचे म्हणणे आहे. या वेळी आवरे येथे बिबट्याला पकडण्यासाठी सापळादेखील लावण्यात आला होता, तर गेल्या वर्षी रानसई येथील आदिवासी वाडीनजीकच्या जंगलात एका बिबट्याला जेरबंद करण्यात आले होते.