मुंबई : प्रतिनिधी
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सहा प्रमुख शहरांना लागू करण्यात आलेले निर्बंध आता राज्यात लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये 31 मार्चपर्यंत सिनेमा-नाट्यगृहे, व्यायामशाळा आणि जलतरण तलाव बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्य शासनाने सर्व जिल्हाधिकार्यांना पत्रक पाठवून तसे आदेश
दिले आहेत.
राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, नागपूरसाठी जे निर्बंध लागू केले होते, ते सर्व आता संपूर्ण राज्याला लागू केले आहेत. त्यामुळे येत्या 31 मार्चपर्यंत राज्यातील सर्व थिएटर्स, जीम, स्वीमिंग पूल बंद राहणार आहेत. राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकार्यांनीही तत्काळ हे निर्बंध लागू करीत त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि महाराष्ट्रातील परिस्थिती जाणून घेतली. त्याचप्रमाणे सुरक्षेबाबत काय उपाय योजता येतील याबाबतही दोघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.
मुंबईत जमावबंदी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदीचे कलम 144 लागू करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे 31 मार्चपर्यंत टूर्स आणि ट्रॅव्हल्सवर निर्बंध घालण्यात आले आहेत. मुंबई दर्शनसह बिझनेस टूरही रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नये. आम्हाला सहकार्य करावे, असे पोलिसांनी म्हटले आहे.