नवी दिल्ली : वृत्तसंस्था
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला नवीन वर्षात पहिल्या
परदेश दौर्यात पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने वन डे आणि कसोटी मालिकेत भारताला व्हाईटवॉश देत टी-20 मालिकेतील पराभवाचा वचपा काढला. असे असले तरी वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराने भारतीय संघ
कसोटी क्रिकेटमध्ये अजूनही सर्वोत्तम आहे, असे मत व्यक्त केले आहे. तो क्रिकइन्फो संकेतस्थळाशी बोलत होता.
न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा
मानहानिकारक पराभव झाला. न्यूझीलंडच्या जलद मार्यासमोर भारतीय फलंदाज पुरते अपयशी ठरले. भारतीय संघाच्या या कामगिरीबद्दल लारा म्हणाला की, गेल्या काही वर्षांत भारतीय संघ सतत प्रवास करत आहे. माझ्या मते न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिकेतला पराभव हा याच सतत क्रिकेट खेळण्याने झाला आहे. वन डे आणि टी-20 मालिका खेळल्यानंतर न्यूझीलंडच्या वातावरणात कसोटी खेळणे भारताला अवघड गेले असावे.
दरम्यान, या पराभवानंतरही कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताने अव्वल स्थान कायम राखले आहे. सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बहुतांश क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात भारतीय संघाची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी कशी होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.