पेणमध्ये कार्यक्रम; मान्यवरांची उपस्थिती
पेण : प्रतिनिधी
कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या स्थानिक विकास निधीतून रायगड जिल्ह्यातील शाळांसाठी डिजिटल साहित्याचे वाटप शिक्षकांना करण्यात आले. या साहित्याचा विद्यार्थ्यांसाठी पुरेपूर वापर करावा, असे आवाहन या वेळी उपस्थित मान्यवरांनी केले.
पेण येथील भाजपच्या कार्यालयात गुरुवारी (दि. 1) झालेल्या या कार्यक्रमाला आमदार रविशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील, उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, आमदार निरंजन डावखरे यांच्या पत्नी नीलिमा डावखरे, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, माजी जि.प. सदस्य प्रभाकर पाटील, डी.बी. पाटील, बाजार समितीचे माजी सभापती शरद येरुणकर आदी उपस्थित होते.
कोकणातील शाळा डिजिटल करण्याचा निर्धार करून विद्यार्थ्यांना आधुनिकतेचे धडे देण्यासाठी विशेषकरून हे डिजिटल साहित्यवाटप करण्यात आले आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील विविध शाळांमधील उपस्थित शिक्षक, मुख्याध्यापक यांना आपल्या शाळेसाठी प्रिंटर, संगणक, प्रोजेक्ट यांसारखे डिजिटल साहित्याचे वाटप केले गेले.
या वेळी आमदार रविशेठ पाटील यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात डिजिटल इंडियाचा नारा दिला असून त्यानुसार आमदार निरंजन डावखरे यांनी आपल्या कोकणात डिजिटल साहित्याचे वाटप केले आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी त्याचा पुरेपूर वापर करून नवी पिढी तयार करावी, असे आवाहन केले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी, ज्या ठिकाणाहून पदवीधर घडतात त्या शाळा-महाविद्यालयांना अशा प्रकारचे डिजिटल साहित्यवाटप करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आमदार निरंजन डावखरे यांनी घेतला असल्याचे सांगत कौतुक केले.
माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी, उद्याचा देश घडवायचा असेल तर विद्यार्थ्यांवर संस्कार करण्यासाठी त्यांनी डिजिटल जगात प्रवेश करावा आणि त्यांना ती भाषा समजावी ही दूरदृष्टी ठेवून आमदार निरंजन डावखरे यांनी डिजिटल साहित्य वाटपाचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.