Breaking News

नागोठणे एसटी बसस्थानकातून तिकिटांचे आरक्षण बंद

नागोठणे : प्रतिनिधी

येथील बसस्थानकात पूर्वीपासून मुंबई, पुणे तसेच इतर लांब पल्ल्याच्या एसटी बसेसचे आगाऊ आरक्षण होत असे. संगणकीय युगात आणखी काही नवीन गाड्यांचे आरक्षण चालू होणे अपेक्षित असताना सध्याच्याच गाड्यांचे आरक्षण बंद करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. याचा फटका प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांनाच बसत असून त्या संदर्भात येथील निवृत्त शिक्षक भास्कर सोलेगावकर यांनी निवेदनाद्वारे परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक श्रीमती बारटक्के आणि रोहे आगारप्रमुख सोनाली कांबळे यांचे लक्ष वेधले असून, त्यांनी नागोठणे स्थानकातील आरक्षण सुविधा पूर्ववत चालू करावी, अशी मागणी केली आहे.

नागोठणे येथील एसटी बसस्थानकात रोज शेकडो बसेसची वर्दळ असते. पूर्वी येथून मुंबई तसेच पुण्याकडे जाणार्‍या काही बसेसचे आरक्षण होत असे. कालांतराने मुंबईकडे जाणार्‍या गाड्यांचे आरक्षण करणे बंद झाले असले तरी, सकाळी पावणे आठ आणि दुपारी साडेतीन वाजता येणार्‍या रोहे-पुणे या गाड्यांचे आरक्षण होत असे व त्यासाठी नागोठणे स्थानकातून प्रवाशांसाठी चार जागा (सीट) आरक्षणाद्वारे उपलब्ध होत्या. ज्येष्ठ नागरिक भास्कर सोलेगावकर यांना महिन्यातून तीन ते चार वेळा पुण्याला जावे लागत असते. दरवेळी ते स्थानकातील वाहतूक नियंत्रक कार्यालयातून आगाऊ आरक्षण करून पुणे येथे जात असतात. नेहमीप्रमाणे पुण्याला जाण्यासाठी ते आगाऊ आरक्षण करण्याकरीता नागोठणे एसटी स्थानकात गेले असता, तेथे ड्युटीवर असणार्‍या एका बदली वाहतूक नियंत्रकाने त्यांच्याशी उर्मटपणाची भाषा केली व आरक्षण बंद का झाले आहे, याची माहिती न देता, पुण्याला जायचे असेल तर आरक्षण करायला रोह्याला जा, नाहीतर ऑनलाईन रिझर्व्हेशन करा, असा सल्ला दिला. ज्येष्ठ नागरिकांना असलेल्या सवलतीचे ऑनलाईन आरक्षण होत नसतानाही या महाशयांनी असा सल्ला कसा काय दिला, असे सोलेगावकर यांचे म्हणणे आहे.

याबाबत येथील वाहतूक नियंत्रक भालचंद्र शेवाळे यांच्याजवळ विचारणा केली असता, त्यांनी या दोन्ही गाड्यांचे आरक्षण सध्या बंद झाले असल्याचे मान्य करताना, नागोठणे स्थानकातून ज्या चार जागा आरक्षणाद्वारे उपलब्ध केल्या आहेत, त्या सीट नंबरचेसुद्धा ऑनलाईन आरक्षण झाल्याचे प्रकार घडले आहेत. एकाच सीटचे दोनदा आरक्षण होत असल्याने वादाचे प्रसंगसुद्धा उद्भवत होते. तांत्रिक चुकीमुळे दोनदा आरक्षण होत असल्याचे निदर्शनास आल्याने येथून दिले जाणारे आरक्षण तात्पुरते बंद केले आहे. रोहे आगारप्रमुख कांबळे यांच्या ही महत्वपूर्ण बाब निदर्शनास आणून दिली असून त्यांच्या म्हणण्यानुसार साधारणतः 22 ते 23 मार्चपर्यंत नागोठणे स्थानकातून दिली जाणारी आरक्षण सेवा पूर्ववत होईल, असे शेवाळे यांनी संबंधित प्रतिनिधीजवळ स्पष्ट केले.

Check Also

हम दिल दे चुके सनम @ 25

उत्कंठामय गोष्ट, देखणं सादरीकरण समीर (सलमान खान) भारतीय शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी या कलेतील निष्णात पंडित …

Leave a Reply