Thursday , March 23 2023
Breaking News

मैदान विकसीत करताना खोदकामात आढळली वाळू

कर्जतमध्ये स्थानिकांत भीती; तहसीलकडून वाळू साठवून ठेवण्याच्या सूचना

कर्जत : बातमीदार

शहरातील आमराई मैदानात कर्जत नगर परिषदेच्या माध्यमातून क्रीडांगण विकसित केले जात आहे. त्या कामाचे भाग म्हणून गॅलरीचे बांधकाम करण्यासाठी जेसीबी मशीनने खोदकाम केले असता वाळूचा साठा सापडला आहे. दरम्यान, वाळू आणि ती देखील जमिनीमधील असल्याने त्या वाळूवर उड्या पडण्याची शक्यता असून, गरज नसताना जादा खोदकाम केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. दरम्यान, कर्जत तहसील कार्यालयाने ती वाळू साठवून ठेवण्याच्या सूचना नगर परिषद प्रशासनाला दिल्या आहेत.

कर्जत आमराई मैदानातील क्रीडांगण विकासकामाचे भूमिपूजन जानेवारी 2019 मध्ये झाले. गेल्या दोन दिवसांपासून आमराई झोपडपट्टीच्या बाजूने प्रेक्षक गॅलरी उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यासाठी सुरू केलेल्या खोदकामात एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा सापडला. तो बघून खोदकाम करणार्‍या जेसीबी चालक आणि ठेकेदारांचेही डोळे फिरले. त्यांनी खोदकाम करण्याचे बाजूला ठेवून वाळू काढण्यास सुरुवात केली. 20 ब्रास एवढी कोणताही दगड नसलेली वाळू काढल्यानंतर आणि मैदानाच्या मागील बाजूस साठा केल्यानंतर त्याबद्दल  तहसीलदार अविनाश कोष्टी यांना माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ जमिनीतील वाळूवर महसूल विभागाचा ताबा असल्याने आपल्या मंडळ अधिकार्‍यांकडून पंचनामा करून वाळू कोणीही घेऊन जाणार नाही असे आदेश दिले.

वाळू साठा सापडल्याची माहिती मिळताच नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी आमराई मैदान गाठले. तेथे गॅलरी उभारण्याच्या कामाची माहिती घेऊन त्यांनी तहसील कार्यालय गाठले.

वाळू साठा करीत असताना त्याचे स्वामित्व शुल्क महसूल विभागाकडे भरावे लागते, मात्र शासकीय जमिनीत शासकीय विकासकामे करताना सापडलेल्या वाळूचा साठ्यावर महसूल विभागाची मालकी असते, हे लक्षात घेता मुख्याधिकारी कोकरे यांना तहसीलदार कोष्टी यांनी त्या वाळूची चोरी होणार नाही, अवैध वाहतूक होणार नाही, याची काळजी नगर परिषद प्रशासनाची राहील, असे सूचित करून आवश्यक असेल तेवढेच खोदकाम करावे, अशी सूचना तहसीलदार कोष्टी यांनी केली.

दुसरीकडे जमिनीमधील वाळू साठा सापडला म्हणून खोदकाम करणारा ठेकेदार आणि जेसीबी चालक हे आणखी खोदकाम करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत. जेवढे खोदकाम गॅलरी बांधण्यासाठी आवश्यक आहे, त्यापुढे खाली जाऊन खोदकाम करू नये, अशी स्थानिकांची विनंती ठेकेदार मान्य करीत नसल्याचेदेखील सांगण्यात येत आहे.

वाळू साठा सापडला असल्याची माहिती मिळताच मैदानात जाऊन पाहणी केली. तहसीलदार अविनाश कोष्टी यांच्या सूचनेनुसार वाळू साठा सुरक्षित ठेवण्यात येत आहे.

-रामदास कोकरे, मुख्याधिकारी, कर्जत नगर परिषद

वाळू सापडली असल्याने वाळूमाफिया आमराई मैदानात सक्रिय होण्याची शक्यता आहे, ही बाब लक्षात घेता शासनाच्या जागेत मिळालेली वाळू चोरीला जाण्याची शक्यता आहे. त्याचवेळी गरज नसतानादेखील खोदकाम केले जात असून त्यास आमचा विरोध आहे.

-संजय सुर्वे, स्थानिक नागरिक, कर्जत

आमराई मैदानात खोदकाम करताना सापडलेली वाळू नगर परिषद अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यकता नसेल तर खोदकाम करू नये आणि सापडलेल्या वाळूविषयी महसूल विभाग नंतर निर्णय घेणार आहे.

-अविनाश कोष्टी, तहसीलदार, कर्जत

Check Also

पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरिकांना एकूण करात दिलासा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply