पनवेल : प्रतिनिधी – नवीन पनवेलमध्ये राहणारे माजी सैनिक रवी पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना नागरिकांचे वागणे पाहून शासनाला उद्या लष्कराला बोलवावे लागले तर काय परिस्थिती उदभवेल याची दिलेली माहिती निश्चितच विचार करायला लावणारी आहे. बेसिक मे राडा (बीएमआर) म्हणजे बिमार, असे सांगून त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले
बिमारी ही आहे की, अनास्था मुख्य दोन पातळींवर दिसते. पहिली, विमानतळावरुन करोना वाहक भले सरकारी भुलचुकीने त्यांच्या ईप्सित स्थानी गेले. सरकार त्यांच्या मागावर होते/आहे. पण आता अनास्था-2 चालू झाले. 14 एप्रिल बर्यापैकी दूर आहे. कोविड-19 वर ताबा मिळवायचा म्हणजे, विषाणू वाहक आणि बिगर वाहक दोघांनी मास्क लावणे अतिशय गरजेचे आहे. इथे मात्र जो तो स्वत:च्या मर्जीने वागताना दिसतो. हे अतिशय चुकीचेच नव्हे तर संपूर्ण घातक आहे. सोसायटीची गल्ली, आजूबाजूच्या परिसरातील झोपडपट्टी, चाळी, वाण्याचे दुकान, डेअरी, रस्ते सगळीकडे साधारण 60% लोक मास्क लावतात. उरलेल्या 40% पैकी काही जणांचे मास्क नाका-तोंडा ऐवजी मेडल सारखे गळ्यांत असतात. आपण विचारले की, मास्क का लावत नाही तर वैतागून हातानी मास्क हलवून दाखवतात, हे काय?
आपली देशभक्ती किंवा परिस्थितीचे गांभीर्य याच पातळींवर आहे. माझ्या या शहरात चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. टू-थ्री-फोर व्हीलर वाले यथेच्छपणे सिग्नल तोडणे, राँग साईडने गाडी चालविणे, लेफ्ट फ्री साईड ब्लॉक करणे सर्रासपणे सुरू आहे. कोणाला हात लावायची हिम्मत कोणी करताना दिसत नाही. कारण काय असावे? ही आपली अंमलबजावणी पातळी आहे. आहोत ना आपण सारेजण स्मार्ट सिटी कर. तर, आता अनास्था-2 प्रमाणे जर 40 टक्के लोक मास्कचे उल्लंघन करणारी असतील तर या महान देशातील 50-60 कोटी जनता, पंतप्रधान, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, डॉक्टर, सायंटीस्ट यांचे न ऐकता या नाजूक क्षणी आपले उपद्रव मुल्य वापरणार असेल तर कोविड-19ला प्रशासन किती आणि कसा, कधीपर्यंत अटकाव करू शकेल?
आमच्या एअरफोर्समध्ये एक सुविचार लिहीलेला असे, वी वर्क हार्ड, वी स्वीट आवर ब्लड इन पीस सो दॅट वी ब्लीड लेस ड्युरिंग वॉर. साहेब, हे जे कोविड-19 चालू आहे ते एकप्रकारे जैव युध्दच आहे. ते आपण सारेजण मिळूनच परतुन लावू शकतो. सार्यांमध्ये मास्कची मास जागरूकता होणे आवश्यक नव्हे अत्यावश्यक आहे. सर्व विक्रेत्यांकडे ठळक दिसणारे, मास्क सर्वांना अपरिहार्य, फलक हवेतच. स्थानिक, जबाबदार जाणकारांनी लक्ष ठेवणे तसेच त्रुटींकडे संबंधितांचे लक्ष वेधणे अतिशय गरजेचे आहे. भारतीय सैन्य संख्येने काही लाखांत असले तरी, प्रत्येक गल्लीबोळाचा विचार करता अपुरे आहे. आणि मग देशाच्या सीमा कोणी राखायच्या की उघडल्या ठेवायच्या? वेळ नाजुक आणि अद्रुश वैर्याची (विषाणु कोविड-19ची) आहे. म्हणून उच्च दर्जाचा समजूतदारपणाच आपल्याला यातून सुखरुप पैलतीरावर नेईल. जैविक युध्द गल्लीबोळादारापर्यंत आलंय. त्याला, लष्कर नव्हे स्थानिकांनी परतवून लावायचंय. सरकार बाधितांची काळजी घेत आहेच. स्थानिकांनी आपली जबाबदारी उचललीच पाहिजे. उरलेल्या दहा दिवसांत या जबाबदारी ज्ञान यज्ञाची सांगता आपल्याला करायची आहे, जात, धर्म, प्रांत, भाषा या सार्यांच्या पलीकडे जाऊन. आहेत ना सारे स्थानिक सोबत? की तु हो पुढे, मी आलोच.