बाजार समिती प्रशासन, पोलिसांचा निर्णय
पनवेल : बातमीदार – वारंवार आवाहन करूनही गर्दी कमी होत नसल्याने पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन आणि पोलिसांनी एकत्र येऊन बाजार दररोज सुरू न ठेवण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीत आता सर्वसामान्य आणि किरकोळ भाजीविक्रेत्यांना भाजीपाला मिळणार नाही.
पनवेल शहरात पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. तालुका स्तरावरील बाजार समितीत खोपोली, खालापूर, उरण परिसरातील शेतकरी आणि घाटमाथ्यावरून भाजीपाला, कांदे-बटाटे विक्रीसाठी आणले जातात. या बाजारात किरकोळ विक्रेते आणि सर्वसामान्य ग्राहकदेखील भाजी घेण्यासाठी गर्दी करतात. दहा दिवसांपासून नागरिकांकडून भाजीखरेदी करण्यासाठी गर्दी केली जाते. बाजार समितीचा परिसर दाटीवाटीचा असल्यामुळे आणि जवळपास मोकळी जागा नसल्याने सामाजिक अंतर राखण्यासाठी उपाययोजना करता आल्या नाहीत.
पहाटेच्या वेळेला संचारबंदीचे आणि सुरक्षेच्या कारणांचे उल्लंघन करून बाजारात गर्दी होत होती. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय लांडगे आणि बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, शेतकरी प्रतिनिधी, संचालक मंडळाच्या बैठकीत बाजार समिती दररोज सुरू न ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. कांदा-बटाटा बाजार आणि भाजी मंडई कधी सुरू राहणार आणि बंद ठेवणार असे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
‘खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंग पाळा’
नागरिकांनी एकाच वेळी गर्दी न करता सामाजिक अंतर पाळून खरेदीसाठी यावे, असे आवाहन बाजार समिती आणि पोलीस प्रशासनाने केले. या निर्णयाची अंमलबजावणी गुरुवारपासून सुरू करण्यात आली. शेतकरी, व्यापारी, हमाल, ग्राहक आणि इतरांनी या वेळापत्रकाची दखल घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
असे असेल वेळापत्रक
भाजी मंडई : सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार
कांदा-बटाटा बाजार : बुधवार, गुरुवार, रविवार