Breaking News

मोगर्‍याचा सुगंध शेतातच; लॉकडाऊनमुळे फुले कोमेजली; उत्पादक चिंतेत

कर्जत ः बातमीदार

एरवी केसांत माळला जाणारा गजरा असो की श्रद्धेने देवाला वाहिला जाणारा हार असो या सगळ्यांसाठी लागणारी फुले सध्या शेतातच सुकून जात आहेत. कोरोनाने जगभर घातलेल्या थैमानामुळे महाराष्ट्रातही 23 मार्चपासून लॉकडाऊन सुरू करण्यात आले. परिणामी बाजारच बंद असल्याने शेतात फुलणारी फुले शेतातच कोमेजत आहेत. यामुळे फूल उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असून रोज हजारो रुपयांच्या होणार्‍या नुकसानीने जगायचे कसे, असा प्रश्न आता शेतकर्‍यांना पडला आहे.

रायगड जिल्ह्यातील कर्जत हा मूळचा भाताचे कोठार असा नावलौकिक असणारा तालुका आहे. या तालुक्यात आधुनिकतेची कास धरत शेतकर्‍यांनी भाताव्यतिरिक्त वेगळी पिके घेण्यासही सुरुवात केली. त्यामुळे शेतकर्‍यांना या शेतीतूनच अधिक नफा मिळू लागला. दहिवली येथे यशवंत भवारे यांची सुमारे साडेचार एकर शेती आहे. या शेतातील दोन एकरांत त्यांनी फूलशेती बहरवली आहे. मोगरा, नेवाळी, तुळस अशी पिके त्यांनी या शेतात लावली आहेत. पाच गुंठे क्षेत्रात नेवाळी, 20 गुंठे क्षेत्रात मोगरा व उर्वरित दीड एकरात त्यांनी तुळशीची लागवड केली आहे. नेवाळी व मोगर्‍याच्या फुलातून काढणी केल्यावर साधारण 300 रुपये किलोने ही फुले विकली जातात, तर तुळशीतून साधारण रोजचे दीड ते दोन हजार रुपये उत्पन्न ते घेतात. मुंबईतील दादर येथे फुलांची मोठी बाजारपेठ असल्याने बहुतेक सर्व माल हे काढणी केल्यावर तिथे विक्रीसाठी पाठवला जातो.

मात्र कोरोनाने जगभर माजवलेल्या हाहाकाराने महाराष्ट्रासह देशात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे सगळीकडे बाजारपेठ बंद आहे. त्यामुळे शेतकर्‍यांवरही त्याचा मोठा प्रभाव पडला. परिणामी रोजची तयार होणारी फुले ही शेतातच सुकू लागली आहेत, तर काढणी न केल्याने तुळसही सुकली. कष्टाने तयार केलेली आपल्या शेतीची वाईट अवस्था शेतकर्‍यांना आपल्याच डोळ्यांनी बघावी लागत आहेत. त्यामुळे हे फूल उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. रोज हजारोंचे नुकसान होत असल्याने तसेच अनिश्चित काळासाठी असलेल्या लॉकडाऊननंतर पावसाळ्यात खायचे काय, असा प्रश्न या शेतकर्‍यांना पडला आहे.

– दहिवली तर्फे वरेडी येथे माझी साडेचार एकर शेती आहे. त्यातील दोन एकरांत मी आंतरपीक म्हणून मोगरा, नेवाळी, तुळस अशी शेती केली होती. त्यातून चांगला नफा मिळत होता, मात्र लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद झाल्यामुळे आमची फुले शेतातच सुकू लागली. रोज जवळपास साडेतीन हजारांचे नुकसान होत आहे. शेतीवरच घर अवलंबून असल्याने शासनाने आम्हा फूलशेती उत्पादक शेतकर्‍यांना मदत करावी. -यशवंत भवारे, शेतकरी

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply