उरण : प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या संचारबंदी लॉकडाऊनदरम्यान उरण परिसरात अडकून पडलेल्या परराज्यातील मजुर, कर्मचार्यांची आरोग्य विभागाकडून दररोज आरोग्य तपासणी करण्यात येत असल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे. उरण तालुक्यात संचारबंदी लॉकडाऊनदरम्यान विविध क्षेत्रात ठेकेदारीत रोजंदारीवर काम करणारे परराज्यातील सुमारे चार हजारांहून अधिक मजूर अडकून पडले आहेत. तालुक्यातील असाल तिथेच थांबण्याच्या आदेशानंतर ठिकठिकाणी तयार करण्यात आलेल्या लेबर कॅम्पमध्ये हे मजूर वास्तव्य करून आहेत. या परराज्यातील मजुरांची उरण आरोग्य विभागाकडून दररोज आरोग्य तपासणी केली जात आहे. सोमवारी (दि. 13) जेएनपीटी परिसरात असलेल्या शिर्के कंपनीच्या मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच या मजुरांना तहसील कार्यालयाच्या माध्यमातून अन्नधान्याचाही पुरवठा केला जात असल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे.