Breaking News

आजची पिढी मोबाईलच्या आहारी

कल्याण रेल्वे स्टेशन जवळ एक तरुणी कानात इअर फोन  अडकवून मोबाईलवर गाणी ऐकत रेल्वेलाईनवरुन चालत जात होती. आपल्या मागून ट्रेन येत असल्याकडे तिचे लक्षच नव्हते. मोटारमनने जोरात हॉर्न वाजल्यावर तिने घाईघाईने बाजूला जाण्याचा प्रयत्न केला पण नशिबाने साथ दिली नाही. भावी आयुष्याची स्वप्ने रंगवणार्‍या तिचे स्वप्न अधुरे राहिले. बातमी ऐकून अनेकांना वाईट वाटले. दोन-तीन दिवस सगळे हळहळत होते.

आज शाळा आणि महाविद्यालयात मुलांना त्यांच्या अभ्यासाविषयी सगळी माहिती मोबाईलवर दिली जाते. त्यामुळे मुले कायम मोबाईल मध्येच असतात. पालकांनी विचारल्यावर अभ्यास करतोय सांगतात. प्रत्यक्ष काय करतात हे पालक कधी बघतच नाहीत. आजची तरूणपिढी मोबाईलच्या आहारी गेली आहे. एक वेळ त्यांना जेवण नसले तरी चालेल पण मोबाईल शिवाय ते राहुच शकत नाहीत. प्रवासात  किंवा रस्त्याने चालताना त्यांच्या कानाला मोबाईल असतोच. कानात इअर फोन अडकवून बसल्याने त्यांना घरात कोण काय बोलत आहे, याचा पत्ताच नसतो. रस्त्याने चालताना आजूबाजूचा आवाज येत नाही आणि मग पालकांवर हळहळण्याची वेळ येते.   

मी दोन दिवसांपूर्वी एका मित्राकडे गेलो होतो. तो घरी नव्हता त्याचा नेहमी गडबड करणारा लहान मुलगा घाबरून कोपर्‍यात मान खाली घालून बसला होता. मला समजेना याला काय झाले म्हणून मी त्याला विचारले अरे, आज काय झाले आहे. तेवढ्यात त्याची आई म्हणाली, अहो रात्री मोबाईल खेळायला घेऊन त्याने मोठा उद्योग करून ठेवला. त्यामुळे आमचे धंद्यात मोठे नुकसान झाले. त्याचे बाबा खूप चिडलेत सकाळी हा शाळेत गेला होता म्हणून वाचला नाहीतर त्याने मार खाल्ला असता. शाळेतून घरी आल्यावर मी त्याला विचारल्यावर आता बाबा ओरडणार म्हणून तो घाबरून बसला आहे. मला समजेना 10-12 वर्षाच्या मुलाच्या हातून काय मोठी चूक झाली असावी ज्यामुळे मित्राला धंद्यात मोठे नुकसान सोसावे लागले. मी अखेर न राहून विचारले, की वाहिनी एवढे काय केले त्याने की, धंद्यात मोठे नुकसान सोसावे लागले. आहो, या मुलांना मोबाईल घेऊन खेळाची सवय लागली आहे. त्याचा बाबा घरात आला की, हा मोबाईल घेऊन खेळत बसतो. गेम खेळताना आवाज येऊ नये म्हणून मोबाईलचा आवाज बंद करून ठेवतो. काल ही रात्री हा मोबाईल घेऊन खेळत होता. त्याने आवाज बंद करून ठेवला होता. खेळता खेळता झोपला आणि मोबाईलचा आवाज बंदच राहिला. सकाळपासून अनेक ग्राहकांचे फोन येत होते पण रिंग बंद असल्याने त्यांना समजलेच नाही. एका मोठ्या ग्राहकाने अनेक वेळा फोन करून उत्तर न मिळाल्याने आमची ऑर्डर दुसर्‍याला दिली. त्यामूळे मोठे नुकसान झाले.

मोबाईल हातात आल्यावर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच त्याचे वेड लागले आहे. आज घरातील संवाद बंद झाले आहेत. घरात ही एकमेकांशी बोलताना अनेक जण मोबाईलवर मेसेज पाठवून बोलताना दिसतात. पती-पत्नी दिवसा काम करीत असताना एकमेकांना मेसेज पाठवतात. प्रत्यक्ष संवाद फार कमी झाला आहे. कामावरून घरी आल्यावर चहा घेत किंवा रात्री जेवताना एकमेकांशी संवाद करताना कोणी दिसत नाही. या सवयीमुळे अनेकजण व्याधीग्रस्त झाले आहेत. आपली पत्नी कायम मोबाईलवर असते म्हणून एकाने न्यायालयात घटस्फोट मागितल्याचे ही उदाहरण आहे. प्रत्येकजण मोबाईलवर चॅटिंग करताना किंवा गेम खेळताना दिसतात. त्यामुळे मुलांना ही मोबाईलवर खेळण्याचे आकर्षण वाटले तर नवल नाही. लहानपणी मुलगा रडू लागला की, त्याला मोबाईल हातात देऊन गप्प बसवण्याची सवय लावलेली असते. थोडेसे कळायला लागल्यावर मुले मोठ्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ती मोबाईल मधले खेळ खेळायला लागतात. गेम खेळताना आवाज आल्यास पालक ओरडतील या भीतीने मुले त्याचा आवाज बंद करून ठेवतात. त्यामूळे महत्वाचे फोन आल्याचे समजत नाही.

-नितीन देशमुख, फेरफटका

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply