Breaking News

म्हसळा-श्रीवर्धनमधील 50 गावांचा वीजपुरवठा पूर्ववत

म्हसळा ः प्रतिनिधी – दक्षिण रायगडमधील माणगाव, महाड, म्हसळा, पोलादपूर तालुक्यांत मेघगर्जनेसह कोसळलेल्या पावसाने येथील वीजपुरवठा सायंकाळी खंडित झाला होता. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये येथील जनजीवन विस्कळीत झाले होते. त्याच वेळी म्हसळा तालुक्यात रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वार्‍यामुळे श्रीवर्धन व म्हसळा या दोन्ही तालुक्यांतील किमान 50-60 गावांतील वीजपुरवठा खंडित झाला होता, परंतु म. रा. वि. वि. कंपनीच्या अधिकारी-कर्मचार्‍यांनी तीन तासांत येथील वीजपुरवठा पूर्ववत केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

 म्हसळ्याजवळील बनोटी येथे सायंकाळी सहाच्या सुमारास एचटी लाइनचा पोल व तारा तुटल्या. त्यामुळे म्हसळा तालुक्यातील गोंडघर फीडर पूर्णपणे अंधारात गेल्याने दिघी, बोर्ली, दिवेआगर, वडवली या भागातील बहुतांश गावे तसेच मेंदडी, खरसई, बनोटी या भागातील गावे अंधारात होती. त्याच सुमारास पाष्टी, मांदाटणे, कोळवट, ताम्हने करंबे, भापट परिसरातील अनेक गावांत अंधारमय वातावरण होते, परंतु कमीत कमी वेळेत व कामगारांत म. रा. वि. वि. कंपनीचे उपकार्यकारी अभियंता सतीश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली धीरज बिराजदार, अमोल पालवे, प्रतीक माने हे अभियंता व ज्येष्ठ वायरमन बाबूराव साळवी, दिनकर शिंदे, प्रकाश साळवी, शैलेंद्र गुलगुले, शैलेश देशपांडे ही मंडळी सतत कामाला लागून तीन तासांत वीजसेवा पूर्ववत केल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

वारा आणि पावसामुळे सायंकाळी सर्वत्र अंधार झाला होता. तसेच गावाच्या वेशीवर कोरोनाचे संकट होते. सोशल मीडियावर रात्र अंधारातच काढावी लागणार, अशी चर्चा होती. त्यातच आम्ही म. रा. वि. वि. कंपनीच्या अधिकार्‍यांना फोन केला. तेव्हा काम अंतिम टप्प्यात असल्याचे कळाले. थोड्याच कालावधीत वीज आल्याने कोरोनाच्या संकटकाळात म. रा. वि. वि. कंपनीचे कर्मचारी हे योद्धेच ठरले आहेत.

-गौरीताई पयेर, मा. जि. प. सदस्य

Check Also

पनवेल रेल्वेस्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल रेल्वेस्थानक परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे …

Leave a Reply