उरण : रामप्रहर वृत्त
शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शाळास्तरीय स्वच्छता अभियानासाठी 2 ऑक्टोबर ते 24 डिसेंबर 2022 पर्यंत ‘स्वच्छता मॉनिटर’ प्रकल्प जाहीर केला. प्रकल्पसंचालक रोहित आर्या यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संपूर्ण महाराष्ट्रातून पाच सक्रिय जिल्ह्यांची निवड झाली. त्यात प्रामुख्याने जालना, बुलढाणा, मुंबई(उत्तर), पूणे, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश झाला. या उपक्रमात सहभागी झालेल्या हजारो शाळांमधून सर्वोत्कृष्ट 40 शाळा निवडल्या गेल्या. त्यात रायगड जिल्ह्यातील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या द्रोणागिरी येथील श्रीमती भागुबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विद्यालयाची निवड झाली आहे. स्वच्छता मॉनिटर या उपक्रमाची 2 ऑक्टोबर 2022 रोजी मुहूर्तमेढ रोवली गेली होती. त्यात विद्यार्थ्यांनी परिसरात कुठेही कचर्याबाबत निष्काळजीपणा घडताना आढळल्यास ती चूक निदर्शनास आणून ती सुधारण्याचा आग्रह धरला. मुलांच्या अशा कृतींचे ऑडिओ-व्हिडिओ क्लिप (फेसबुक, इन्टाग्राम) या सामाजिक माध्यमांद्वारे लेट्सचेंज व स्वच्छता मॉनिटर या लिंकवर पाठवण्यात आले. स्वच्छतेबाबत सातत्याने प्रचार – प्रसार झाल्यामुळे समाजातील कचर्याबद्दलच्या निष्काळजीपणाच्या सवयींमध्ये बदल घडून आलेला दिसला. सर्वोत्तम कामगिरी करणार्या निवडक विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट लेट्सचेंज, स्वच्छता मॉनिटर सन्मानित करून राज्यात कुठेही कार्यरत राहणाच्या दृष्टीने ओळखपत्र प्रमाणित करण्यात येणार आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी, जिल्हा समन्वयक व श्रीमती भागुबाई चांगु ठाकूर विद्यालया, द्रोणागिरी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुराधा काठे, प्रतिनिधी अंकिता पाटील आणि काही निवडक विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यासाठी मुंबई मंत्रालयामध्ये शालेय शिक्षणविभाग लवकरच कार्यक्रम आयोजित करत आहे. या स्तुत्य उपक्रमाबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी शाळेचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.