हिंदू संस्कृतीत मुहूर्ताला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कोणतेही शुभ कार्य करायचे म्हणजे त्यासाठी चांगला मुहूर्त असावा लागतो. चांगल्या मुहूर्तावर सुरू केलेल्या कार्यात हमखास यश मिळणारच असा विश्वास असतो. वैशाख महिन्यातील शुध्द तृतीयेला येणार्या अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त म्हणून समजल्या जाते.
संपूर्ण दिवसभर हा दिवस चांगल्या समजल्या जातो. त्यामुळे अक्षय तृतीयेला व्यापारीवर्गात व समाजात अनेक विशेष करून शेतकरी वर्गात महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गुंजभर तरी सोने खरेदी करण्याची फार पूर्वीपासूनची परंपरा आजतागायत चालू आहे. या दिवशी खरेदी केलेल्या सोन्याने घरात लक्ष्मीचा वास होतो आणि वर्षभर संपत्तीत वृद्धी होते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे राज्यात या दिवशी अनेक लोकाकडून सोने खरेदी केल्या जाते. व्यापाराच्या दृष्टीने हा दिवस शुभ मानला जातो. भारतीय पंचांगानुसार दिवाळी व दसरा या सणानंतर अक्षय तृतीया तिथीचा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. शेतकरी वर्गासाठी तर हा दिवस आपल्या नवीन कामाचा शुभारंभ करण्याचा दिवस असतो.
या दिवशी शेतकरी आपल्या घरातील सर्व सदस्यांसह शेतात जातात. त्याठिकाणी शेती कामासाठी उपयोगी पडणारे नांगर, फाळ, वखर इत्यादी अवजारांची यथायोग्य पूजा करून शेतातील कामाची सुरुवात करतात. जमिनीची भाजणी, ढेकळे फोडून वाफे तयार करणे, शेतातील तण वेचणे व कचरा जाळून नष्ट करणे इत्यादी कामे केल्या जातात. पूजाअर्चा विधी संपल्यानंतर शेताला शिजवलेला भात, हरबर्याची भाजी, दही व आंबील याचा नैवेद्य दाखविला जातो. शेतात बसून शेतकरी व त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य वनभोजन करतात. बायका-पोरं शेतातील झाडाला दोरी बांधून संपूर्ण दिवसभर झोका खेळण्याचा आनंद घेतात. याच दिवसापासून शेतकरी आपल्या शेतीसाठी सालगडीचा करार करतात.
अक्षय याचा अर्थ कधीही क्षय न होणारा, नाश न पावणारे असा आहे. त्यास्तव हा दिवस प्रत्येकाने व्यापाराने शेतकर्यांनी आणि आपण सर्वजण मोठ्या आनंदाने साजरा करावे तसेच नवीन वर्षात काहीतरी चांगले काम करण्याचा संकल्प या दिवशी केल्यास त्यात आपणास नक्कीच यश मिळेल.
-नागोराव येवतीकर, विषय शिक्षक कन्याशाळा धर्माबाद, जि. नांदेड