पनवेल : वार्ताहर
सीएनजीवर चालणार्या गाड्यांना अलिकडच्या काळात आगी लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात आपल्या आसपास घडताना दिसत आहेत. मग ती गाडी कंपनी फिटेड असो अथवा बाजारात बसविलेले सीएनजी असो रस्त्यावरून चालत्या गाडीला किंवा उभ्या गाडीला अचानक आग लागते.
अॅडव्हान्स टेक्नॉलजीने एक जादुई कांडी फिरविल्याप्रमाणे फोर व्हिलर चक्क स्वस्त दरांत उपलब्ध होणारी सीएनजी गाडी आली. विविध कंपन्यांनी कंपनी फिटेड सीएनजी गाडी मार्केटमध्ये आणली. आधीच या करीता सीएनजी पेट्रोल पंपचीही सुविधा मोठ्या शहरात जागोजागी सोय केली गेली असल्याने पेट्रोल से सीएनजी सस्ता या उक्तीने विविध राज्यातील मोठ मोठ्या शहरात सीएनजी गाड्या रस्त्यावर धाऊ लागल्या. त्यानंतर बसेस सुध्दा सीएनजी आल्या, मग बाजारातही सीएनजी कीट अत्यंत अल्पदरात विविध स्तरावर सर्व सामान्य आपल्या पेट्रोल गाड्या सीएनजी किट लाऊन घेऊ लागले. हे फॅड कमालीचे वाढत गेले. पेट्रोल अंत्यत नाममात्र किमतीत असतानाही वर्षानुवर्षे अपघात वगळता पेट्रोल गाडीने कधी पेट घेतल्याचे ऐकीवात नाही, परंतु आज मितीला सीएनजी गाड्यांना आगी लागण्याच्या प्रकारात लक्षणीय वाढ झाल्याचे प्रकर्षाने जाणवते.
विविध राज्यात फक्त सीएनजी गाड्यांनी अचानक कोणताही अपघात न होता ह्या गाड्या पेट घेण्याच्या प्रकारात दिवसेगणीक वाढ होताना दिसत आहे. मग त्या गाडीत कंपनी फीटींग सीएनजी किट असो अथवा मार्केटचे लोकल सीएनजी किट असो असे भयावह प्रकार सातत्याने पहावयास मिळतात. पनवेल तालुक्यात टी. पॉईन्टजवळ एका सॅलेरो गाडीने अचानक पेट घेतल्याने पुर्ण चारचाकी गाडी भस्मसात झाली, तर पळस्पे पुलाखाली नुकतीच एक चार चाकी जळुन खाक झाली. अलिबागमध्येही काही दिवसांपूर्वी एक उभ्या कारने भर बाजारात पेट घेतल्याने सीएनजी जरी स्वस्त वाटत असेल, परंतु ती वरील घटनांमुळे धोकादायकच ठरू शकते.
सीएनजी कीटवर जेव्हापासुन गाड्या धाऊ लागल्या तेव्हा पासुन अचानक गाड्यांना आग लागण्याच्या प्रकारात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसत आहे. इतके वर्ष लोटली, परंतु पेट्रोल अथवा डिझेल वर चालत असलेल्या गाड्यांनी अपघात वगळता कधी अचानक पेट घेतलाय हे मात्र ऐकीवात नाही.