पनवेल : वार्ताहर – पनवेल शहरातील वीजग्राहकांसाठी वीज वितरण कंपनीचे पनवेल शहर कार्यकारी अभियंता जयदीप नानोटे यांनी विशेष उपाय योजना केली आहे.
वीजग्राहकांना लॉकडाऊनच्या काळामध्ये वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले होते. यासाठी नवीन यंत्रणा सुद्धा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार कमी घडत आहेेत. वीज ग्राहकांना ऑनलाइन वीज भरणा करता येत नाही. त्याचप्रमाणे ज्या सोसायटीचे कॉमन मीटरचे बिल व इतर ग्राहकांचे बिल चेकद्वारे करण्यात येते, अशा ग्राहकांसाठी पनवेल उपविभाग टपालनाका येथे चेक ड्रॉप बॉक्सची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
या बॉक्समधील चेक हे प्रत्येक सोमवारी वीज वितरणचे कर्मचारी जमा करून त्याची पावती तयार झाल्यावर संबंधितांना फोनद्वारे सुचित करण्यात येणार आहे. तसेच ही पावती ग्राहकाला व्हॉटसअॅपद्वारे पाठविली जाणार आहे. तरी ग्राहकांनी आपला मोबाइल क्रमांक व वीज ग्राहक क्रमांक आपल्या चेकच्या पाठीमागे नमूद करावा व महावितरण कंपनीस सहकार्य करावे, असे आवाहन पनवेल शहर उपविभाग कार्यकारी अभियंता जयदीप नानोटे यांनी केले आहे.