मासेमारीला कोरोनाचा फटका; शासकीय मदतीची अपेक्षा
श्रीवर्धन ः प्रतिनिधी – गतवर्षीचे चक्रीवादळ, अवकाळी पाऊस यांच्या नुकसानातून उठत नाही, तोच मच्छीमारांना कोरोनामुळे झालेल्या अतोनात नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. मासळी विक्रीला परवानगी देण्यात आली असली तरी ग्राहकांअभावी बहुतांश बांधवांचा खिसा रिकामाच राहिला आहे. त्यात महाराष्ट्र सरकारकडून 140 कोटी रुपयांचा डिझेल परतावा मंजूर होऊनही अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे सद्यस्थितीत काही मिळकत नसल्याने नव्या हंगामात मासेमारी कशी करायची व आताचे हे कसोटीचे दिवस घालवायचे कसे, या विवंचनेत मच्छीमार बांधव सापडले आहेत. सरकारी उदासीनता तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे मच्छीमारी व्यवसाय उद्ध्वस्त झाल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.
आज कोकण किनारपट्टीवर मच्छीमार आर्थिक संकटात सापडला आहे. मच्छीमारीवर आधारित छोट्या मोठ्या व्यावसायिकांची दयनीय अवस्था झाली आहे. अनेक वेळा आलेल्या समुद्री वादळांमुळे मच्छीमारांचे कंबरडे मोडले आहे. मच्छीमार आपल्या जीवाची पर्वा न करता नौकांना लागणारे डिझेल, बर्फ, ऑइल इत्यादी जीवनावश्यक वस्तू घेऊन खोल समुद्रात मासेमारीसाठी जातात, परंतु खोल समुद्रात जाऊनही मासे मिळत नसल्याने रिकाम्या हाती परतावे लागते. खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊनही रिकामे आल्याने होणारा खर्च दिवसेंदिवस वाढत गेला. त्यामुळे नोकरांचे पगार, डिझेल, ऑइल, भत्ता, जाळी खर्च व कर्जाचे थकलेले हप्ते या सर्व परिस्थितीने मच्छीमारांवर जणू काही आसमानी संकटच कोसळले आहे. नेहमीच गजबजलेल्या मच्छीमार बंदरावर तर सर्वत्र शुकशुकाट पसरलेला दिसत आहे. कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन मिळवून देणारा मासेमारी व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे. रायगडसह श्रीवर्धन तालुक्यातील मच्छीमारी ठप्प झाली आहे. परिणामी मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोळी महिला शासनाच्या नियमांचे पालन करून मासेविक्री करीत आहेत, मात्र पुरेशा प्रमाणात मासळीची विक्री होत नाही.
सध्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिघी, कुडगाव, आदगाव, भरटखोल, दिवेआगर, जीवना बंदर, मूळगाव, दांडा विभाग, बागमांडला आदी ठिकाणच्या मच्छीमारांनी आपापल्या नौका किनार्यावर ओढण्यास सुरुवात केली आहे. मासेमारी व्यवसाय आज पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर शासनाने मच्छीमार बांधवांना आर्थिक मदत करून या व्यवसायास नवसंजीवनी द्यावी, अशी अपेक्षा मच्छीमार बांधव व्यक्त करीत आहेत.
मच्छीमारी आमचा मुख्य व्यवसाय आहे. त्यावर आमचा व छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. गतवर्षीची चक्रीवादळे व आता कोरोनामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आम्हाला आत्महत्येशिवाय कुठला पर्याय राहिला नाही. तरी शासनाने मच्छीमारांचा गांभीर्याने विचार करून आर्थिक मदत करावी, अशी मच्छीमारांची मागणी आहे.
-हरिओम चोगले, भरटखोल मच्छीमार नेते
मच्छीमारांची खूपच दयनीय अवस्था झाली आहे. नवीन हंगाम सुरू करण्याच्या मनस्थितीत कुठलाही मच्छीमार दिसत नाही. शिल्लक डिझेल परतावा आणि डागडुजीसाठी उपलब्ध भांडवल यामुळे यंदा ही परिस्थिती ओढवली आहे. शासनाने मच्छीमारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, अशी मच्छीमारांची अपेक्षा आहे.
-एकनाथ वाघे, बुजुर्ग मच्छीमार नेते
कोकणातील मच्छीमार हा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. दैनंदिन होत असलेला नौकांचा खर्च, खलाशांचा पगार व थकीत बँक हप्त्यांमुळे मच्छीमार आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे शासनाने शेतकरी बांधवांप्रमाणे मच्छीमारांनाही आर्थिक मदत करावी.
-चंद्रकांत वाघे, व्हा. चेअरमन, श्रीकृष्ण मच्छीमारी संस्था