खोपोली : प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीने खोपोलीतील कोरोना बाधित रुग्णांना तसेच विलगीकरणात असलेल्या कुटुंबियांना दोन वेळच्या जेवणाचे डबे देण्याचा उपक्रम गेल्या वीस दिवसांपासून सुरू आहे. या ’अन्नपूर्णा योजना’ अंतर्गत आतापर्यंत 200 हून अधिक जेवणाचे डबे देण्यात आल्याची माहिती या प्रकल्पाचे प्रमुख रोहित कुलकर्णी यांनी दिली.कोरोनामुळे अख्खे कुटुंब बाधित होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कधी कधी घरातील प्रमुख व्यक्ती कोरोना बाधित होतात. खोपोलीमध्ये अनेक कुटुंबे बाहेरून आलेली आहेत. त्यांचे नातेवाईक खोपोलीत नसतात. अशा वेळी जेवणाची मोठी अडचण निर्माण होते. कोविड रुग्णालयात जेवण देण्यासाठीही सहसा कोणी तयार होत नाही. या सर्व बाबींचा विचार करून रा.स्व.संघ जनकल्याण समितीच्या कार्यकर्त्यांनी 40 कुटुंबांचा एक संच तयार करून, या कुटुंबियांच्या मार्फत कोविड रुग्णालयातील गरजू रुग्णांना जेवणाचे डबे नि:शुल्क देण्याचे काम हाती घेतले. तसेच घरी विलगीकरणात असलेल्या कुटुंबियांनाही दोन वेळचे जेवण समितीमार्फत दिले जाते. डबे पोहोचवणार्या कार्यकर्त्यांचीही एक वेगळी फळी तयार करण्यात आली आहे. आतापर्यंत 225 डबे देण्यात आले आहेत. खोपोली आणि परिसरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता, जेवणाची समस्या भेडसावणारे अजून कोणी गरजू रुग्ण असतील तर त्यांनी समितीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करावा, असे आवाहन जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह नितीन भावे यांनी केले आहे.