- आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीला यश
- 4 मेपासूनचा पनवेल बंद रद्द
पनवेल : रामप्रहर वृत्त
मुंबई महापालिकेत पनवेल व इतर भागातून अत्यावश्यक सेवेत रोज कामावर येणार्या कर्मचार्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्यामुळे इतर शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पावले उचलण्याची गरज होती. त्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांनी याकडे राज्य शासनाचे लक्ष वेधले. यासंदर्भात मुंबई महापालिकेतर्फे या कर्मचार्यांची सोय मुंबईमध्येच हॉटेलमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्वप्रथम केलेल्या मागणीला यश आले असून, पनवेलकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मागणीला यश आल्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलकरांशी संवाद साधून मुंबई महापालिका आणि समस्त पनवेलकर यांचे आभार व्यक्त करून स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या, असे आवाहन सर्वांना केले आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले आहे की, पनवेल आणि परिसरातील मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवेचे काम करणारे जे जे सेवाकर्मी आहेत ते खर्या अर्थाने कोरोना वॉरियर्स आहेत. त्या सगळ्यांची राहण्याची व्यवस्था कोरोना संक्रमण दूर होईपर्यंत मुंबईमध्येच करावी, अशी मागणी केली होती. त्याला मुंबईच्या आयुक्तांनी प्रतिसाद दिला आहे. त्यांच्या माध्यमातून आदेश दिल्यामुळे या सेवाकर्मींची कामाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था होणार आहे. त्याबद्दल मी मुंबई महापालिकेचे आयुक्त यांचे आभार व्यक्त करीत आहे तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करतो की, जशी मुंबई महापालिकेने व्यवस्था केली आहे तशीच मुंबईमध्ये काम करणार्या पोलीस, बेस्ट आदी सेवा देणार्या सर्वांची व्यवस्था कोरोनाचे संक्रमण दूर होईपर्यंत मुंबईमध्येच करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने किंवा मुंबई महापालिकेने पाऊले उचलावीत.
पनवेलच्या दृष्टिकोनातून व्यापारी, संघटना, नगरसेवक, नागरिकांनी सर्वांनी मिळून मुख्यमंत्री यांच्याकडे तगादा लावला असल्याचे नमूद करून आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे आभारही व्यक्त केले आहेत. पनवेल क्षेत्रात वाढणारे संक्रमण पाहता वैद्यकीय सेवा वगळून 4 मेपासून बंदची हाक दिली होती. आता त्यावर मुंबई महापालिकेने आपल्याला प्रतिसाद देऊन सेवाकर्मींची व्यवस्था मुंबईमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 4 मेपासूनचा बंद रद्द करण्यात आला आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी जाहीर केले आहे, परंतु समस्त पनवेलकरांनी घरात रहावे, सुरक्षित रहावे आणि कोरोनाचे संकट पळवून लावण्यासाठी सर्वांनी मिळून सहकार्य करावे, असे आवाहनही आमदार त्यांनी नागरिकांना केले आहे.