Breaking News

‘आयएफएससी’वरून आज गळे काढणार्‍यांनी पूर्वी काय केले? भाजप नेते आशिष शेलारांचा खडा सवाल

मुंबई : प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (आयएफएससी) हलविण्यासंबंधीच्या टीकेला भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, आज गळे काढणार्‍यांनी 2007 ते 2014 दरम्यान काय केले? आयएफएससी आजही मुंबईत शक्य आहे. तसा प्रस्ताव आम्हीच दिला होता. आता तुम्ही महाराष्ट्राचे सत्ताधारी आहात. नुसता शिमगा करू नका. केंद्राला सांगा, केंद्राकडे मागा, त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करा. आम्ही सोबत आहोत. शेलार यांनी ट्विट करून भाजपची बाजू मांडतानाच विरोधकांचे वाभाडे काढले आहेत.

आशिष शेलार यांनी पुढे सांगितले की, आयएफएससी स्थापन करण्यासाठी उच्चाधिकार समितीने फेब्रुवारी 2007मध्ये मुंबईत हे केंद्र स्थापनेबाबत एक अहवाल केंद्र सरकारला सादर केला. 2014पर्यंत तेव्हा महाराष्ट्राच्या काँग्रेसी राज्यकर्त्यांनी ना प्रस्ताव सादर केला, ना केंद्रातील काँग्रेस सरकारने त्याचा विचार केला.

बुलेट ट्रेनवरूनही टीका करताना शेलार म्हणाले, बुलेट ट्रेनचे स्टेशन बीकेसी येथे प्रस्तावित करताना केंद्र सरकारने बीकेसी येथे आयएफएससीचा विचार केला. आयएफएससीची इमारत नियोजित करूनच स्थानकाची अट घातली. आता सांगा बुलेट ट्रेनला विरोध कोणी केला? राज्यात कोणताही प्रकल्प येणार म्हटल्यावर विरोधाच्या फुगड्या कोण घालतो?

-काही जण काँग्रेसच्या तालावर टिपर्‍या खेळताहेत!

काही जण काँग्रेसच्या तालावर आज टिपर्‍या खेळत आहेत. आयएफएससीवरून बेंबीच्या देठापासून जे ओरडत आहेत, शंख करीत आहेत, कोल्हेकुई करीत आहेत त्यांची अवस्था तर आपण हसायचे दुसर्‍याला आणि शेंबूड आपल्या नाकाला अशी झाली असल्याचा टोला आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधताना लगावला.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply