Sunday , September 24 2023

जिद्दीच्या जोरावर एनएमएमटी चालकाची मुलगी झाली पीएसआय

पनवेलच्या कन्येची यशोगाथा

पनवेल : बातमीदार

एनएमएमटीवर वाहनचालक म्हणून नोकरी करीत असलेले पनवेल तालुक्यातील कोळखे गावातील दिलीप जाधव यांचे मुलीला पोलीस बनविण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. दीपाली जाधव असे दिलीप जाधव यांच्या मुलीचे नाव असून नुकत्याच जाहीर झालेल्या एमपीएससी परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून उत्तीर्ण झाल्या आहेत.

पनवेल तालुक्यातील पहिलीच महिला या पदावर पोहचल्याने जाधव कुटुंबियांचे आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मार्चमध्ये कोळखे गावातील रहिवासी असलेल्या दीपाली जाधव यांचे प्राथमिक शिक्षण कोळखे गावातील जिल्हा परिषदेच्य शाळेत पूर्ण झाले. त्यानंतर पुढील शिक्षण हे व्ही.के. हायस्कूल, ब्रान्स कॉलेज याठिकाणी पूर्ण झाल्यानंतर दीपाली यांनी पुरंदर कॉलेज लोहगड येथून एम.कॉमचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी एमपीएससीकडे मोर्चा वळवत 2017 साली परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल 2019 मार्चमध्ये जाहीर झाल्यानंतर त्यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. वडील एनएमएमटी चालक असताना त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी काहीच कमी पडू दिले नाही. वडील दिलीप जाधव यांना दोन मुले आहेत. दीपाली यांना लहानपणापासून पोलीस सेवेत रुजू करण्याचे स्वप्न त्यांनी इच्छाशक्तीच्या जोरावर पूर्ण केले आहे. मागील 22 वर्षांपासून दिलीप जाधव एनएमएमटी चालक म्हणून कार्यरत आहेत. मुलीच्या यशाबद्दल विशेषतः आमचे सर्वत्र कौतुक होत आहे. हे आमच्यासाठी खूप अभिमानास्पद बाब आहे. विशेष म्हणजे पोलीस उपनिरीक्षकपदी पनवेल तालुक्यातील पहिली महिला म्हणून माझ्या मुलीची निवड झाली हे देखील खूप प्रेरणादायी असल्याचे मत एनएमएमटी चालक दिलीप जाधव यांनी सांगितले.

शिक्षण हेच माझ्यासाठी  सर्वस्व आहे. महिलांनी कधीही स्वत:ला कमी समजू नये माझ्या यशात कुटुंबीयांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी आज हे यश संपादित केले आहे.

-दीपाली जाधव

Check Also

महाडच्या गोमुखी आळीतील शतकोत्तर दशकपूर्ती गणेशोत्सव

महाड ः रामप्रहर वृत्त ऐतिहासिक व सामाजिक क्रांतीचे ठिकाण म्हणून शिवकाळापासून नोंद झालेल्या महाड शहरातील …

Leave a Reply