Tuesday , February 7 2023

बाप-लेकीचा एक महिन्याचा उपवास

कर्जत : प्रतिनिधी

कर्जत शहरातील एका जैन समाजाच्या कुटुंबातील वडील व मुलगी यांनी चतुर्मासात एक महिन्याचा उपवास करण्याचा संकल्प करून अन्नत्याग केला होता. हे दोघेही एक महिनाभर केवळ गरम पाणी पिऊन राहात होते. बाप-लेकीने एकाच वेळी एक महिना उपवास करणे ही रायगड जिल्ह्याच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. त्यांच्या या व्रताची सांगता जैन समाजाने शहरातून अगदी शांतपणे मिरवणूक काढून केली.

कर्जत शहरातील योगेश मांगीलाल ओसवाल (वय 46) आणि त्यांची कन्या कु. प्रियंता ओसवाल (वय 17) यांनी एकाच वेळी एक महिना उपवास केला. यामध्ये अन्नाचा कणही त्यांनी घेतला नाही. केवळ गरम पाणी पिऊन त्यांनी हे व्रत पूर्ण केले. याबाबतची माहिती अशी की, कर्जतच्या 81 वर्षांच्या पहिल्या साध्वी दिव्य प्रभाश्रीजी या काही वर्षांपूर्वी कर्जतला चतुर्मासासाठी आल्या असता योगेश ओसवाल यांनी ‘तुम्ही पुन्हा कर्जतमध्ये चतुर्मासासाठी याल तेव्हा मी महिनाभर उपवास करीन’ असा संकल्प केला होता. त्या यंदा चतुर्मासासाठी कर्जतमध्ये आल्या आणि योगेश यांनी उपवासाची सुरुवात केली. त्यांची कन्या प्रियंता हिनेसुद्धा वडिलांबरोबरच एक महिन्याच्या उपवासाचा संकल्प पूर्ण केला. या कालावधीत दोघांनीही आपल्या दैनंदिन कामात खंड केला नाही.

त्यांच्या उपवासाची सांगता कर्जत मधील जैन समाज बांधवांनी मिरवणूक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून केली. यामध्ये ओसवाल कुटुंबीय, तसेच उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, मोहन ओसवाल, रणजित जैन, मंगल परमार, सुभाष सोलंकी, दिनेश सोलंकी, साध्वी मोक्षर्थ रुची, आमदार महेंद्र थोरवे, माजी नगराध्यक्ष शरद लाड, राजेश लाड, नगरसेवक संकेत भासे आदींसह जैन बांधव-भगिनी उपस्थित होते.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply