Breaking News

नवी मुंबईतील धोकादायक इमारतींचा पुनर्विकासाचा प्रश्न सोडवण्याची मागणी

नवी मुंबई : बातमीदार

पावसाळ्याला पुढील महिन्यात सुरुवात होणार आहे. या काळात नवी मुंबई शहरात सर्वांत मोठा प्रश्न असेल तर तो नवी मुंबई व वाशी येथील मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींचा. तांत्रिक बाबींमध्ये अडकलेल्या या इमारतींचा पुनर्विकासाचा प्रश्न सोडवावा व तसे निर्देश सिडको व पालिकेला द्यावेत, अशी मागणी भाजपच्या अनुसूचित जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष विकास सोरटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

नवी मुंबईत धोकादायक इमारतींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या वर्षी महापालिकेने 400च्या आसपास इमारती धोकादायक म्हणून घोषित केल्या होत्या. त्यात काही अतिधोकादायक इमारती होत्या. या धोकादायक इमारतींत बहुसंख्य रहिवासी निवासास आहेत. भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असाही सवाल आता  रहिवासी उपस्थित करीत आहेत. सिडकोनिर्मित इमारती धोकादायक इमारतींच्या यादीत आहेत. त्यामुळे एकीकडे शहरात अडीच एफएसआयचा निर्णय घोषणाबाजीव्यतिरिक्त अजूनही प्रलंबितच आहे.

महापालिकेत आठ विभाग कार्यालये असून आठ विभाग कार्यालयांमार्फत संबंधित इमारती धोकादायक असल्याचे निदर्शनास येताच इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करून घेण्यास सांगितले जाते. त्याप्रमाणे सोसायटीने करून दिलेल्या अहवालानुसार पालिका त्याची तपासणी करून ती इमारत धोकादायक आहे की नाही ते तज्ज्ञ व्यक्तीमार्फत निश्चित केले जात असल्याचा दावा केला जातो. यानंतर धोकादायक घोषित इमारतीमधील रहिवाशांना स्वतःलाच व्यवस्था करण्याचे फर्मान काढले जाते. शासनाने पुढाकार घेत नमुंमपा प्रशासनाला योग्य ते निर्देश द्यावेत, अशी मागणी विकास सोरटे यांनी केली आहे.

Check Also

रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्‍या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील …

Leave a Reply