पनवेल ः बातमीदार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. त्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने 3000 पीपीई किट्सची खरेदी केली. बाजारभावापेक्षा शंभर रुपये कमी दराने ही खरेदी करण्यात आली.
पनवेल महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 88 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुका रेड झोनमध्ये, तर इतर जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आहे. पनवेल तालुक्यात मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने पुढील संकटाला सामोरे जाण्यासाठी तयारी केली आहे. महापालिकेने पीपीई किट्स खरेदी करण्यासाठी काही दिवसांपूर्वी निविदा प्रसिद्ध केली होती. निविदेला प्रतिसाद मिळाल्यानंतर महापालिका प्रशासनाने पीपीई किट्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला. प्रति पीपीई किटचा दर 700 रुपये इतका आहे, मात्र महापालिकेला मिळालेल्या प्रतिसादानुसार 600 रुपये दराने प्रति पीपीई किट महापालिकेला मिळाले. महापालिकेने नव्याने 3000 पीपीई किट्स खरेदी केल्यामुळे प्रशासनाकडे सध्या 4000 पीपीई किट्स उपलब्ध आहेत. येत्या काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास महापालिकेला अजून 10 हजारांहून अधिक पीपीई किट्स खरेदी करण्याची आवश्यकता भासू शकते, असे मत पनवेल महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांनी व्यक्त केले.
महापालिका हद्दीत राहणार्या नागरिकांना कोरोनाची लागण अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडल्यानंतर अधिक होत आहे. ही संख्या पुढे वाढत राहिल्यास रुग्णांवर उपचार करण्यासाठी 3000 पीपीई किट्स खरेदी केले आहेत. भविष्यातदेखील किट्सची आवश्यकता भासू शकते. सध्या तरी महापालिकेकडे मुबलक पीपीई किट्स आहेत. -गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महानगरपालिका