Breaking News

कोरोनामुळे एनएमएमटी तोट्यात

पनवेल : बातमीदार

नवी मुंबई पालिकेची परिवहन सेवा तोट्यात असून पालिकेच्या उत्पन्नावर सुरू आहे. दरम्यान करोना प्रादुर्भावानंतर टाळेबंदीत ही बससेवाही बंद असल्याने परिवहनचे उत्पन्न ठप्प झाले होते. त्यानंतर शिथिलीकरणानंतर हळूहळू ही बससेवा सुरू झाली असून लोकल बंद असल्याने प्रवासी बस प्रवासाला प्राधान्य देत आहेत.

एनएमएमटीच्या 480 बसपैकी 325 बस सध्या धावत आहेत. टाळेबंदीच्या आधी प्रतिमहिना ‘एनएमएमटी’चे एकंदरीत उत्पन्न 11.50 कोटी होते ते आता 5.80 कोटींवर आले आहे. त्यामुळे परिवहन उपक्रमाची आर्थिक परिस्थिती अजूनच नाजूक झाली आहे. त्यात वातानुकूलित बससेवेकडे मात्र प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. थंड वातावरणात करोनाचा विषाणू अधिक काळ राहात असल्याने प्रवासी या बसने प्रवास टाळत आहेत.

टाळेबंदीपूर्वी या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत होता. बांद्रा, बोरीवली या भागांत मोठ्या प्रमाणात वातानुकूलित बस धावत होत्या. पालिका परिवहन उपक्रमाकडे एकूण 480 बस असून त्यातील 115 बस या वातानुकूलित आहेत. टाळेबंदीच्या पूर्वी 115 पैकी सरासरी 100 बस धावत होत्या. त्यातून परिवहनला चांगले उत्पन्नही मिळत होते. परंतु टाळेबंदीनंतर या बसचे प्रवासी घटले आहे. परिणामी परिवहन उपक्रमाने या बसच्या फेर्‍या कमी केल्या आहेत. वातानुकूलित बसने प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या कमी झाल्याने या बस कमी सोडल्या जात असल्याची माहिती परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी दिली.

टाळेबंदीपूर्वी वातानुकूलित बस सेवेतून दिवसाचे उत्पन्न 6 लाख 50 हजार तर प्रवासी 1200 होते. टाळेबंदीनंतर  वातानुकूलित बस सेवेतून दिवसाचे उत्पन्न 3 लाख 78 हजार झाले असून प्रवासी 900 झाले आहेत.

वातानुकूलित बसकडेही पाठ

टाळेबंदीत बंद असलेली नवी मुंबई परिवहन सेवा पूर्वपदावर येण्यासाठी प्रयत्न करीत असली तरी चांगली आर्थिक उत्पन्न देणारी वातानुकूलित बस सेवेकडे मात्र प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. दिवसाला तीनशे प्रवासी कमी झाल्याने उत्पन्नही निम्म्याने घटले आहे. टाळेबंदीपूर्वी या सेवेतून मिळणारे साडेसहा लाखांचे उत्पन्न आता फक्त तीन लाख 78 हजारांपर्यंत मिळत आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply