Breaking News

खोपोलीतील ‘त्या’ मुलाबाबत उलगडा

आई रागावल्याने घर सोडून आला होता

खोपोली : प्रतिनिधी – लॉकडाऊन काळात अनेक सुखद, तर कधी मन हेलावणार्‍या घटना घडत असून, खालापुरात रस्त्याच्या कडेला प्रसुती झालेल्या बाळाचे कोडकौतुक सुरू असताना दुसर्‍या घटनेत रागात घर सोडून आलेल्या 12 वर्षांच्या मुलाची तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी मुंब्र्यातील आई-वडिलांशी संपर्क करून दिला आहे.

आई रागावली या कारणावरून मुंब्रा येथे राहणारा शोएब अन्सारी 5 मे रोजी घर सोडून पळाला होता. तो कधी ट्रकमध्ये, कधी कोणाच्या गाडीत, तर कधी कामगारांसोबत चालत चालत खालापूरपर्यंत पोहोचला. रात्रीच्या वेळेस पोलिसांना शोएब रस्त्याच्या कडेला रडत चालत जाताना दिसला. मला आई-वडील नाहीत आणि आत्या चार दिवसांपूर्वी वारली, असे शोएबने पोलिसांना सांगितले.

खालापूर येथे अनेक मजुर कुटूंबांना शाळेत तात्पुरता निवारा आणि जेवणाची सोय केली होती त्या ठिकाणी शोएबला ठेवण्यात आले. या शाळेत जवळपास वेगवेगळ्या राज्यातील 60 मजूर राहत होते. या मजुरांच्या मुलांसोबत शोएब रमला. शासनाने या मजुरांना गावी पाठविण्याची व्यवस्था केल्यानंतर शनिवारी खालापूर शाळेतील मजूर कुटूंबांनी गावची वाट धरली. सर्व गेल्यानंतर एकटा राहिलेल्या शोएबची चिंता सर्वांना सतावत होती. तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी शोएबला विश्वासात घेत त्याची महिती घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याने तो मुंब्र्याचा आहे व आई रागवल्याने घरातून पळून आल्याचे सांगितले. शोएबच्या खिशातील शाळेच्या आय कार्डवर असलेल्या मोबाईलवर तहसीलदार चप्पलवार यांनी संपर्क साधला असता, शोएबच्या पालकांना मुलगा सुरक्षित असल्याचे समजले. शोएबला व्हिडीओ कॉलवरून पालकांशी संवाद साधण्यास दिल्यानंतर त्याच्या आई-वडिलांना अश्रू अनावर झाले.

शोएब अल्पवयीन असल्याने रायगड चाईल्ड लाइनचे अशोक जंगले यांच्यामार्फत बालकल्याण समिती सदस्य निता कदम यांच्याशी संपर्क केला व शोएबला घरी सोडण्यासाठीची प्रक्रिया काय असेल याबाबत माहिती घेऊन त्याला पालकाच्या स्वाधीन करण्यासाठी तयारी केली आहे.

-इरेश चप्पलवार,  तहसीलदार, खालापूर

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply