कोरोना व्हायरसबाबत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (व्हू)ने वेगवेगळ्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी स्वच्छता आणि सुरक्षेबाबत वेगवेगळ्या सूचना दिल्या जात आहेत. आता ‘व्हू’कडून खाद्यपदार्थांबाबत काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या सूचना पाळणे सोशल डिस्टन्सिंगएवढेच गरजेचे आहे.
जेवण तयार करताना किंवा कोणत्याही खाद्यपदार्थाला हात लावण्याआधी हात चांगल्या प्रकारे स्वच्छ करावेत. टॉयलेटमधून आल्यावर हात नीट धुवावेत. जेवण बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या जागेची स्वच्छता करावी. किचन स्वच्छ ठेवतानाच ते सॅनिटाइझ करणेही गरजेचे असल्याचे ‘व्हू’ने म्हटले आहे.
सर्वच सूक्ष्मजीव हे आजाराचे कारण नाहीत, परंतु अस्वच्छ जागांवर, पाणी आणि प्राण्यांमध्ये घातक सूक्ष्मजीव मोठ्या प्रमाणात असतात. हे सूक्ष्मजीव भांडी पुसण्याच्या कापडावर, किचनमधील इतर कापडांवर किंवा कटिंग बोर्डवर जिवंत असतात. यामुळे ते अन्न पदार्थांमध्ये सजहजरित्या पोहोचू शकत असल्याचा इशारा ‘व्हू’ने दिला आहे.
याशिवाय मांसाहारी पदार्थ बनवत असताना मांस इतर पदार्थांपासून वेगळे ठेवा. कच्चा भाज्यांसाठी किंवा पदार्थांसाठी वेगळी भांडी ठेवा. कच्च्या पदार्थांसाठी वापरलं जाणारे कटींग बोर्ड किंवा चाकूचा वापर पुन्हा धुतल्याशिवाय करू नका.
कच्चे आणि शिजलेले पदार्थ वेगवेगळे ठेवावेत असेही ‘व्हू’ने सांगितले आहे. या कच्च्या पदार्थांमध्ये घातक सूक्ष्मजीव असण्याची शक्यता असते. यामुळे हे पदार्थ अन्य पदार्थांपासून वेगळे ठेवण्यासही ‘व्हू’ने सांगितले आहे.
पदार्थ चांगल्या प्रकारे शिजवून खावेत. खासकरून मांस. हे 70 डिग्री सेल्सिअसवर शिजवावे. पाण्याचं तापमान चेक करण्यासाठी थर्मामीटरचा वापर करू शकता तसेच शिजलेले पदार्थ खाण्यापूर्वी एकदा चांगले गरम करावे.
अन्न चांगल्या प्रकारे शिजवल्यावर त्यातील सर्व कीटाणू मरतात. रिसर्चमधून हे समोर आले आहे की, 70 डिग्री सेल्सिअस तापमानावर शिजलेले अन्न खाण्यासाठी सुरक्षित असते. तेव्हा या सर्व गोष्टी लक्षात ठेवा.