आरोग्य प्रहर
आपल्या शरीरातील हृदय हा अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. हृदयाला जपणं म्हणजे त्याच्या कामात येणार्या अडथळ्यांना दूर करणं. रक्त वाहून नेणार्या रक्तवाहिन्या आकुंचित होणं किंवा त्यांच्या मार्गात काही साठल्याने रक्त वाहण्याला अडचण येणं म्हणजे हृदयाचे अडथळे. जगातील एकूण मृत्यूंपैकी एक तृतीयांश मृत्यू हृदयविकारामुळे होतात.
आपलं हृदय दर मिनिटाला साधारण 70 वेळा धडकतं. उंदरासारख्या लहान सस्तन प्राण्याचं हृदय मिनिटाला 600 वेळा धडकतं, तर महाकाय हत्तीचं हृदय मिनिटाला फक्त 30 वेळा धडकतं. उंदाराचं आयुष्यमान असतं चार वर्षे, तर हत्तीचं सुमारे 86 वर्षे. म्हणजे संपूर्ण आयुष्यात त्यांचं हृदय सुमारे 250 कोटी वेळा धडकतं. आता हाच निकष माणसांबाबत लावला तर 70 वर्षांच्या आयुष्यात माणसाचं हृदय 250 कोटी वेळा धडकतं. सदासर्वकाळ, अजिबात न थांबता हृदय काम करीत असतं. त्यामुळेच त्याची काळजी घेणंही महत्त्वाचं आहे.
हृदयविकाराची माहिती घेण्यासाठी डॉक्टर काही वैद्यकीय चाचण्या सुचवतात. रक्तातील होमोसिस्टीनचं प्रमाण ही त्यांपैकीच एक चाचणी. होमोसिस्टीन हा घटक अन्नातून मिळत नाही, तर तो शरीरात तयार होतो. साधारण 80 वर्षांपूर्वी या घटकाचा शोध लागला. एका विशिष्ट जनुकीय आजारात शरीरातलं होमोसिस्टीनचं प्रमाण खूप वाढतं हे 1932 साली आढळून आलं. त्यानंतर 70च्या दशकात त्याचा हृदयविकाराशी असलेला संबंध उजेडात आला. या काळापर्यंत हृदयविकार होण्याची शक्यता वाढवणार्या अनेक घटकांचा शोध लागला होता. हे घटक म्हणजे धूम्रपान, उच्च रक्तदाब, रक्तातील वाढलेलं कॉलेस्टेरॉल, मधुमेह, पण या सार्यांसोबतच एका नवीन घटकावर प्रकाश पडला होता तो म्हणजे रक्तातलं होमोसिस्टीन. शरीरातील दोन महत्त्वाच्या अमिनो आम्लांच्या मधला दुवा म्हणजे होमोसिस्टीन. ‘ब’ जीवनसत्त्वामुळे होमोसिस्टीनचे सीस्टिनमध्ये रूपांतर होतं. रक्तात ब जीवनसत्त्व पुरेशा प्रमाणात उपलब्ध असेल तर हे रूपांतर होत राहतं आणि होमोसिस्टीनचं प्रमाण मर्यादित राहतं. अर्थातच ही जीवनसत्त्वं कमी पडली तर रक्तातील होमोसिस्टीन वाढू लागतं. सामान्यत: 30 मायक्रोमोल्स प्रति लिटर हे प्रमाण योग्य मानलं जातं. यापेक्षा अधिक प्रमाण म्हणजे 30 ते 100 किंवा 100पेक्षा अधिक हे धोकादायक ठरू शकतं. रक्तवाहिनीचा आपण आडवा छेद घेतला तर एकूण तीन स्तर दिसतात.