रेवदंडा ः प्रतिनिधी
कोर्लई येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत असून गावाच्या वेशीवर कोरोना तपासणी केंद्र उघडण्यात आले आहे. लॉकडाऊन काळात मुंबई, पुणे, ठाणे आदी शहरांत असलेले चाकरमानी गावाकडे परतत आहेत. कोर्लई गावाच्या वतीने त्यांचे स्वागत केले जात आहे, परंतु त्यांनी प्रारंभी आरोग्य तपासणीस सामोरे जावे, असे सुचविण्यात आले असून आरोग्य तपासणीनंतर काही दिवसांसाठी कोर्लई येथील राजिप शाळेत त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे.
कोर्लई येथे गावात प्रवेश करीत असलेल्या वाहनांमधील प्रवाशांची आरोग्य तपासणी, गाड्यांवर सॅनिटायझर फवारणी आदीसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने गावाच्या वेशीवरच कोरोना तपासणी केंद्र उभारण्यात आले आहे.
येथे बाहेरून येणार्या गाड्यांवर सॅनिटायझरची फवारणी केली जाते, तसेच प्रवाशांची आरोग्य तपासणी करूनच गावात प्रवेश देण्यात येत आहे. कोर्लई ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशांत मिसाळ, उपसरपंच, सदस्य, सदस्या, ग्रामसेविका म्हात्रे व ग्रामपंचायत कर्मचारी यासाठी विशेष परिश्रम घेत असून गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी दक्षता घेत आहेत. याकामी कोर्लई ग्रामस्थांचेही उत्तम सहकार्य मिळत आहे.