Breaking News

पीओपी मूर्तिबंदीच्या निर्णयाला स्थगिती द्यावी

गणेश मूर्तिकारांची मागणी

अलिबाग ः प्रतिनिधी

प्रदूषण नियामक मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र या निर्णयामुळे रायगड जिल्ह्यातील पेणमधील गणेश मूर्तिकारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पर्यावरण मंत्रालयाने या निर्णयाला तूर्तास स्थगिती द्यावी, अशी मागणी आता गणेश मूर्तिकारांकडून केली जात आहे.

रायगड जिल्ह्यातील पेण हे गणेश मूर्तिकारांचे गाव म्हणून ओळखले जाते. या परिसरात साडेपाचशेहून अधिक कार्यशाळांमध्ये गणेशमूर्ती बनविण्याचे काम वर्षभर सुरू असते. यात 30 ते 35 हजार कारागीर काम करतात. दरवर्षी जवळपास 40 लाख गणेशमूर्ती पेणमध्ये तयार केल्या जातात.

या गणेशमूर्ती देशविदेशात पाठविल्या जातात. यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. तालुक्यात बहुतांश गणेशमूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर करून तयार केल्या जातात, मात्र आता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवर प्रदूषण नियामक मंडळाने बंदी घातल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मूर्तिकार धास्तावले आहेत.  प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या गणेशमूर्तींचे आता आम्ही करायचे तरी काय, असा प्रश्न त्यांना पडला आहे. पेणमध्ये आजघडीला जवळपास 30 लाख गणेशमूर्ती तयार झाल्या आहेत. त्यांची रंगरंगोटी सध्या सुरू आहे. गणेशोत्सव नजीक आल्याने मूर्ती रंगकामाची लगबग वाढली आहे. कोरोना आणि टाळेबंदीच्या संकटाने आधीच जवळपास दीड महिना मूर्ती बनविण्याचे काम थंडावले होते. आता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालण्यात आल्याची चर्चा सुरू झाल्याने मूर्तिकारांची मोठी कोंडी झाली आहे. त्यामुळे पर्यावरण मंत्रालयाने यात हस्तक्षेप करून प्रदूषण नियामक मंडळाच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती द्यावी, अशी मागणी गणेश मूर्तिकारांकडून करण्यात येत आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply