उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
उरण तालुक्यातील सर्व दिव्यांग प्रतिनिधींनी तहसीलदार भाऊसाहेब अंधारे आणि नायब तहसीलदार नरेश पेडवी यांची नुकतीच भेट घेऊन दिव्यांग व्यक्तींचे प्रश्न मांडले. यामध्ये प्रामुख्याने दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय योजनेचे रेशन कार्डची सुविधा मिळणे गरजेचे आहे, परंतु एक दीड वर्ष होऊनही रेशन कार्ड मिळत नाही. ज्यांचे अंत्योदय योजनेतील रेशन कार्ड होते त्यांची ती योजना काढून त्यांना प्राधान्य गटात रेशन दिले जात आहे. या बैठकीस तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, नायब तहसीलदार नरेश पेढवी यांच्यासह दिव्यांगांचे प्रतिनिधी संदेश राजगुरू, रनिता ठाकूर, हुसैन काझी, सामाजिक कार्यकर्ते प्रा. राजेंद्र मढवी आदी उपस्थित होते. आधीच दिव्यांग व्यक्तींची लग्न होत नसल्याने त्यांचे विभक्त कुटुंब नसल्याने विभक्त कार्ड मिळत नाही. नोकर्या नसल्यामुळे कुटुंबावर ओझे समजले जात असल्याने मानसिक त्रास होतो. जर अंत्योदय योजनेचे किमान रेशन तरी मिळाले तर कुटुंबाला थोडी मदत होते आणि त्या दिव्यांग व्यक्तीला ओझे समजले जात नाही. अशा अनेक विषयांवर तहसीलदार भाऊसाहेब अंधारे आणि तहसीलदार नरेश पेडवी यांच्यासोबत चर्चा झाली. पुढील 15 दिवसांत रेशन कार्डसंदर्भात प्रश्न मार्गी लावला नाही, तर 1 मे या महाराष्ट्र दिनी उरण तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा सर्व दिव्यांग संघटनांनी दिलेला आहे.