Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे दातृत्व ‘रयत’च्या कायम पाठीशी -खासदार शरद पवार

मोखाडा येथे नूतन इमारतीचे उद्घाटन व नामकरण; मान्यवरांची उपस्थिती

मोखाडा : रामप्रहर वृत्त
राजकारण बाजूला सारून सामाजिक हितासाठी सतत कार्य करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे दातृत्व ‘रयत’च्या पाठीशी कायम आहे, असे गौरवोद्गार रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद्मविभूषण खासदार शरद पवार यांनी आज मोखाडा येथे काढले.
सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात सदैव उल्लेखनीय कार्य करणारे, दानशूर व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त बांधण्यात आलेल्या पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन व लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नामकरण समारंभ खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
एक शाळा असलेली रयत शिक्षण संस्था आशिया खंडातील क्रमांक एकची संस्था झाली आहे. ती अनेकांच्या योगदानामुळे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर अण्णांनी शिक्षण कार्यातून महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम केले. महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या विस्तारासाठी महत्त्वपूर्ण काम केले आणि हाच आदर्श कर्मवीर अण्णांनी घेतला आणि त्यामुळे या संस्थेच्या शाखा विस्तारल्या. त्यातील मोखाडा ही एक शाखा असून आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसे देता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राजकारण बाजूला ठेवून शिक्षण कामात लक्ष आणि त्यामध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर संस्थेच्या मदतीला धावून येतात त्या वेळी त्या शाखेचा विकासात्मक बदल घडत असते. कमवा आणि शिका या उद्देशातून शिकलेले लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपले व्यक्तिगत जीवन सुधारत असताना रयत शिक्षण संस्थेला मदत करण्याचे काम अखंडपणे सुरू ठेवले आहे असे नमूद करतानाच एकही वर्ष मदतीशिवाय जात नसल्याचे खासदार शरद पवार यांनी अधोरेखित केले. येथील विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर चमकणार आहेत, कारण येथील आदिवासींच्या जीवनात विकासाचे परिवर्तन घडविण्याचे काम लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
या वेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री व पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्याचा गौरव केला. ते पुढे म्हणाले की, अनेक जण फक्त भाषण करतात, पण असे फार कमी लोकं असतात ते समाजाप्रती असलेले ऋण फेडण्यासाठी काम करतात. लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजाप्रती आस्था आणि प्रेम असलेले व्यक्तिमत्त्व आहेत. त्यामुळे सर्व समाजात दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर यांची ओळख आहे. त्यांच्याकडे एखादा व्यक्ती मदतीसाठी गेला आणि तो रिकाम्या हाती आला असे कधीच झाले नाही. येथील दुर्गम भागात उभारलेली इमारत पाहिले असता आदर्श मॉडेल अशी वास्तू आहे. पालघर जिल्ह्यात विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी असलेली वणवण पाहता आणि सरकारची व्यवस्था सोयीसुविधांमध्ये अनेक अडचण होत्या, पण लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व या ठिकाणी पुढे आल्याने एक आदर्श वास्तू साकारली गेली. विशेष म्हणजे पनवेल परिसरात त्यांच्या विद्यालयाप्रमाणे ही इमारत उभी राहिली त्याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कौतुक करू तेवढे कमी आहेत, असे गौरवोद्गार करताना त्यांचा आदर्श सर्वांनी अंगीकारणे गरजेचे आहे, असेही त्यांनी म्हटले. त्याचबरोबर या ठिकाणी आश्रमशाळा उभारण्यात येणार्‍या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासनही मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले.
विधानसभेचे माजी सभापती तथा रयत शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दिलीप वळसे-पाटील यांनी आपल्या भाषणात म्हटले की, समाजातील प्रत्येक व्यक्तीला शिक्षण मिळाले पाहिजे या हेतूने कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरदराव पवार यांनी अध्यक्ष म्हणून संस्थेच्या प्रगतीसाठी आवश्यक असे काम केले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत अनेकांचे योगदान आहे त्यामध्ये शरदराव पवार आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रचंड योगदान आहे. समाजात अनेक करोडपती आहेत, पण समाजाचे दुःख जाणून स्वतःचे देण्याचे काम त्यांनी केले आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कमवा आणि शिका या योजनेतून शिक्षण घेतले, पुढे नोकरी केली, उद्योजक झाले. विद्यार्थीदशेपासून ते आजपर्यंत ते ‘रयत’सोबत आहेत. त्यांची ओळख समाजाला प्रेरणा असून ते कर्मवीरांचे निष्ठावंत पाईक आहेत. ते लोकभावना जाणतात म्हणूनच रामशेठ ठाकूर यांना लोकनेते म्हणतात. स्वतःची शिक्षण संस्था असतानाही रयत शिक्षण संस्थेवर जीवापाड प्रेम करतात आणि लोकप्रियतेसाठी नाही, तर लोकांसाठी काम करायचे आहे ही त्यांची सतत भूमिका राहिली असून त्यांची भूमिका समाजाला प्रेरणा देणारी आहे, असेही आमदार दिलीप वळसे-पाटील  यांनी सांगितले.
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार राजेंद्र गावित, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार सुनील बुसारा, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, व्हाईस चेअरमन अ‍ॅड. भगीरथ शिंदे, सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पत्नी वर्षा ठाकूर, चिरंजीव परेश ठाकूर, त्यांच्या पत्नी अर्चना ठाकूर, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, मोखाडा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अमोल पाटील, संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुणशेठ भगत, वाय. देशमुख, जे. एम. म्हात्रे, महेंद्र घरत, विनायक पाटील, मोखाडा पंचायत समितीचे सभापती भास्कर थेतले, संस्थेचे सहसचिव राजेंद्र साळुंखे, शिवलिंग मेनकुदळे, मध्य विभाग अध्यक्ष संजीव पाटील, लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. डी. भोर, संस्थेचे माजी सचिव गणेश ठाकूर, आर. डी. निकम, बाबासाहेब भोर, पी. जी. पवार, के. जी. कानडे, किशोर काकडे, एस.के. पाटील, जे. जी. जाधव, सुभाष शिंदे, शहाजी डोंगरे, चंद्रकांत दळवी, रमेश सानप आदी प्राचार्य मंडळींसह महाराष्ट्राच्या कानाकोर्‍यातून मान्यवर मंडळी उपस्थित होते. या वेळी रयत शिक्षण संस्था आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने ठाकूर कुटुंबीयांचा हृद्य सत्कार करण्यात आला.
आम्हाला प्रेम दिले, कॉलेजला नाव दिले त्याबद्दल आभार -लोकनेते रामशेठ ठाकूर
शरद पवारसाहेबांनी कधीही पक्षभेद केला नाही. त्यांचे माझ्यावर नेहमीच प्रेम राहिले आहे. त्याचरोबरीने दिलीप वळसे-पाटील, डॉ. अनिल पाटील यांनीही नेहमीच सहकार्य केले. भगीरथ शिंदे मोठ्या भावाप्रमाणे पाठीशी राहिले. आम्ही सर्व मिळून संस्थेसाठी एकदिलाने काम करीत आहोत. कर्तृत्व देण्यासाठी काम करणे गरजेचे असते कर्मवीर अण्णांनी संस्थेने मला वळण दिले त्याप्रमाणे आपण काम करीत आहोत. आधुनिक पद्धतीचे कोर्सेस या मोखाडा महाविद्यायात उपलब्ध करून देत हे महाविद्यालय नामवंत होईल त्यासाठी प्रयत्न राहणार असून आम्हाला प्रेम दिले, कॉलेजला नाव दिले त्याबद्दल आभार मानतो, असे लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले.

मोखाडा कॉलेजला रामस्पर्श झाला आहे. त्यामुळे हे महाविद्यालय वर्ल्डक्लास कॉलेज होणार आहे. आयपीएस पोलीस भरती, आयटी कोर्स, करिअर गाईड असे विविध कोर्स या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतील. येत्या चार वर्षांत हे महाविद्यालय उत्कृष्ट टेक्निकल कॉलेज असेल.
-डॉ. अनिल पाटील, चेअरमन, रयत शिक्षण संस्था

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply