कर्जत ः बातमीदार
कोरोनाच्या संसर्गामुळे कर्जत तालुक्यातील सर्व शेतकर्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून यावर्षी शेताच्या बांधावरच बियाणे, खते, कीटकनाशके मिळणार आहेत. त्यासाठी शेतकर्यांनी कृषी विभागाच्या पर्यवेक्षक, कृषी सहायकांशी संपर्क साधून आपली नावनोंदणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. कर्जत तालुका पूर्वी भाताचे कोठार म्हणून ओळखला जायचा. तालुक्यात तब्बल 27 हजार हेक्टर जमिनीवर भातपीक घेतले जाते.आता मात्र भाताचे क्षेत्र कमी झाले असून तालुक्यातील 25 टक्के भागात उन्हाळी भातशेती केली जात असून भाताचे पीक आजही चांगल्या प्रकारे घेतले जात आहे. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी भात बियाणे, खते आणि कीटकनाशकांची खरेदी बाजारात जाऊन करू शकत नाहीत. त्यामुळे यंदा शेतकर्यांना त्यांच्या शेताच्या बांधावरच शेतीसाठी आवश्यक गोष्टी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने खरीप 2020साठी कृषी निविष्ठा (रासायनिक खते, बियाणे, कीटकनाशके) आदी साहित्य शेतकर्यांच्या बांधावर पुरवठा करण्यासाठी आपणास आवश्यक असलेली कृषी निविष्ठांची माहिती संबंधित कृषी सहाय्यकांकडे द्यावयाची आहे.कर्जत तालुक्यात कर्जत, नेरळ, कळंब, कशेळे विभागाकरिता कृषी पर्यवेक्षक आणि मंडळ कृषी अधिकार्यांसह कृषी सहाय्यकांची मदत शेतकर्यांना घेता येणार आहे. गावातील शेतकर्यांनी आपसात चर्चा करून एकत्रित माहितीसह आपल्या भागातील कृषी सहाय्यकांशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे यांनी केले आहे.