खोपोली ः प्रतिनिधी
कमी झालेल्या भातशेतीमुळे दुग्ध व्यावसायिकांना पेंढ्याची कमतरता जाणवत असून पावसापूर्वीची बेगमी म्हणून गतवर्षीपेक्षा दुप्पट भावाने पेंढा खरेदी करावा लागत आहे. भाताचे कोठार ही रायगडची ओळख आता पुसट झाली असून हाताच्या बोटावर मोजणारी कुटुंबेच शेती करीत आहेत. खालापूर तालुक्यातदेखील झपाट्याने झालेल्या औद्योगिकीकरणामुळे शेती आणि शेतकरी नष्ट होत चालला आहे. शेतीला पूरक असलेला दुग्ध व्यवसायाचा जोडधंदा मेहनतीचा असला तरी बक्कळ पैसा मिळवून देणारा आहे. गेल्या वर्षी पाच रुपयांना असणारी पेंढ्याची जुडी यंदा 10 रुपयांना झाली आहे. खालापुरात यंदा उन्हाळी भातशेती कमी प्रमाणात लागवड झाल्याने पेंढ्याची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे दुप्पट दर देऊन पेंढा खरेदी केल्याचे दुग्ध व्यावसायिक हरिश्चंद्र जोगावडे यांनी सांगितले. इतर खुराकाबरोबरच पेंढा हे गुरांचे आवडीचे खाद्य आहे. तबेलेवाले जास्त दर देऊन पेंढा खरेदी करतात. त्याचा फटका छोट्या धंदेवाल्यांना बसतो.