Breaking News

मराठी भाषा वृद्धींगत करण्यासाठी वाचन करणे गरजेचे -डॉ. कळमकर

पनवेल : प्रतिनिधी

भाषा ही लवचिक असून, भाषा भावना व्यक्त करणारी असते, पण आता इमोजी वापरले जातात. प्राचीन काळातील लोक जशी चिन्हाची भाषा वापरत होते, तसे आपण पुन्हा मागे जातो की काय असे वातावरण तयार होऊ लागले आहे. मराठी भाषा वृध्दीगंत करायची असेल तर वाचन केले पाहिजे वाचनालयातील पुस्तके वाचकांची वाट पहात आहेत, असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरावडा अंतर्गत ऑनलाइन पध्दतीने आयोजित केलेल्या व्याख्यानामध्ये केले.

मराठी भाषा संवर्धन पंधरावडा अंतर्गत साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांचे ऑनलाइन व्याख्यान आयोजित केले होते. या कार्यक्रमास महापालिकेतील सर्व अधिकारी, विविध विभागातील कर्मचारी, पालिका क्षेत्रातील नागरिक असे सुमारे 160 श्रोते ऑनलाइन उपस्थित होते. पुस्तकातील एखादी ओळ आपल्या जीवनात लख्ख् प्रकाश टाकू शकते हे डॉ. कळमकर यांनी विविध उदाहरणे देऊन पटवून सांगितले. मराठी भाषेचे सौंदर्य उलगडून दाखविताना त्यांनी विविध म्हणी तसेच पु. ल. देशपांडे यांचे किस्से सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त विठ्ठल डाके यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांची ओळख शिक्षणाधिकारी बाबासाहेब चिमणे यांनी करून दिली. कार्यक्रमाचा समारोप सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे यांनी केला. सूत्रसंचालन शुभांगी चव्हाण यांनी केले.

महापालिका 14 जानेवारी ते 28 जानेवारीदरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरावडा साजरा करत आहे. या निमित्ताने  महापालिकेच्यावतीने विविध उपक्रम राबविले जात आहे. नुकत्याच ऑनलाइन पध्दतीने वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच येत्या 24 व 25 जानेवारीला विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर स्पर्धा व मराठी अभिवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत पालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply