उरण : वार्ताहर
महाराष्ट्र सागरी मासेमारी आणि नियमन अधिनियम 1981 अंतर्गत मासेमारी बंदी कालावधी 1 जून ते 31 जुलै असा 61 दिवस करण्याकरिता शासनाने आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्तालयाच्या आदेशानुसार 1 जून ते 31 जुलै असा मासेमारी बंदी कालावधी आदेशित करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर उरण तालुक्यातील करंजा बंदराच्या किनारी व मोरा बंदराच्या किनारी यांत्रिकी बोटी (होड्या) मच्छीमार्यांनी नांगरून ठेवल्या आहेत, असे चित्र दिसत आहे.
मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्तालयाच्या आदेशाप्रमाणे राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात सागरी किनार्या पासून बारा सागरी मैलापर्यंत यांत्रिक मासेमारीला पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. परंतु पावसाळी मासेमारी बंदी हि पारंपारिक पद्धतीने मासेमारी करणार्या बिगर यांत्रिकी नौकांना लागू नसेल. राज्याच्या सागरी किनार्यापासून बारा सागरी मैलापर्यंत यांत्रिक मासेमारी नौका पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करतांना आढळल्यास या मासेमारी नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी निर्माण अधिनियम 1981 कलम 14 अन्वये मासेमारीसाठी वापरले जाणारे गलबत जप्त करण्यात येईल. अधिक माहितीसाठी संपर्क अधिकारी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय अलिबाग (रायगड) 02141-224221 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी केले आहे.
करंजा बंदर किनारी थोड्याच यांत्रिकी बोटी (होड्या नांगरून ठेवल्या जातात तर मोरा बंदरावर दोनशे ते तीनसे यांत्रिकी बोटी (होड्या) नागरून ठेवल्या जातात.
-भालचंद्र कोळी, चेअरमन, करंजा मच्छिमार सोसायटी