Breaking News

राष्ट्रीय कॅरम स्पर्धा; एअर इंडिया, पेट्रोलियम क्रीडा मंडळ विजेते

कुडाळ : प्रतिनिधी

येथील वासुदेवानंद ट्रेड सेंटरमध्ये चालू असलेल्या 47व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या आंतरसंस्था सांघिक पुरुष गटामध्ये एअर इंडियाने; तर महिला गटामध्ये पेट्रोलियम क्रीडा मंडळाने बाजी मारली. रिझर्व्ह बँकेचा आंतरराष्ट्रीय खेळाडू झहीर पाशाने एअर इंडियाच्या झैद अहमदला 15-9, 23-17 असे पराभूत करून संघाला चांगली सुरुवात करून दिली होती, परंतु एअर इंडियाच्या अनुभवी विश्वविजेत्या आर. एम. शंकरा व राष्ट्रीय विजेत्या एम. नटराज जोडीने रिझर्व्ह बँकेच्या सूर्यप्रकाश व व्ही. आकाश जोडीला 25-9, 25-17 असे हरवून सामन्यात अशी बरोबरी साधली. मग तिसर्‍या निर्णायक लढतीत पहिल्यांदाच एअर इंडियाकडून खेळणार्‍या संदीप दिवेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्याने रिझर्व्ह बँकेच्या विश्वविजेत्या प्रशांत मोरेविरुद्ध पहिला सेट 25-2 असा सहज जिंकून विजयाकडे आगेकूच केली, परंतु प्रशांतने दुसरा सेट कसाबसा 23-22 असा जिंकून सामना बरोबरीत आणला. तिसर्‍या सेटमध्ये संदीपने 25-4 असे प्रशांतला पराभूत करून एअर इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तृतीय क्रमांकाच्या लढतीत जैन इरिगेशनने विजय संपादन केला. त्यांनी बलाढ्य पेट्रोलियम संघाला 2-1 असे हरविले.

महिलांच्या अंतिम सामन्यात पेट्रोलियम क्रीडा मंडळाच्या संघाला भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या संघाने कडवी झुंज दिली. विश्वविजेत्या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या एस. अपूर्वाने पेट्रोलियमच्या माजी विश्वविजेत्या रश्मी कुमारीला 19-13, 25-4 असे हरवून संघाला आघाडी मिळवून दिली होती. पेट्रोलियमच्या झ्लावझकीने-परिमला जोडीने भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या परिमी निर्मला-दीपाली सिन्हा जोडीविरुद्ध 10-23 असा पहिला सेट गमाविल्यानंतरही दुसरा व तिसरा सेट 25-17, 20-14 असा जिंकून सामना बरोबरीत आणला.

तिसर्‍या सामन्यात पेट्रोलियमची आंतरराष्ट्रीय खेळाडू काजल कुमारीला भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या मेधा मठकरीविरुद्ध विजयासाठी झगडावे लागले. काजलने हा सामना 16-17, 19-10, 25-6 असा खिशात घालत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तृतीय क्रमांकासाठीच्या लढतीत जैन इरिगेशनच्या संघाने बीएसएनएलवर 2-1 असा विजय मिळवला.

Check Also

हम दिल दे चुके सनम @ 25

उत्कंठामय गोष्ट, देखणं सादरीकरण समीर (सलमान खान) भारतीय शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी या कलेतील निष्णात पंडित …

Leave a Reply