Breaking News

उमरोलीकरांची जीवघेण्या प्रवासातून होणार सुटका!

  • नवीन पुलाचे काम अंतिम टप्प्यात
  • आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रयत्न कामी

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील उमरोली येथील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात छोट्या पुलावरून जीवघेणा प्रवास करावा लागत होता. आता तेथील नवीन पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, यंदाच्या पावसाळ्यापासून उमरोलीकरांची जीवघेण्या प्रवासातून सुटका होणार आहे. याकामी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न कामी आले आहेत.  
पावसाळ्यात गाढी नदीला पूर येत असल्याने उमरोली येथील पुलावरून पाणी जाते. त्यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी पालकवर्ग चिंतेत असतो. या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी उमरोली येथील पुलासाठी विशेष प्रयत्न केले. त्यानंतर उमरोली गावच्या गाढी नदीवरील पुलासाठी एक कोटी 45 लाख 14 हजार रुपये मंजूर करण्यात आले. 2019मध्ये नवीन पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली व सद्य:स्थितीत पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे.  
पनवेल शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर उमरोली गाव वसलेले आहे. तेथे जाण्याच्या मार्गावरील पुलाची उंची कमी असल्याने अतिवृष्टी झाल्यावर गावात जाण्याचा मार्ग दोन-तीन दिवस बंद राहतो. त्यामुळे तेथील ग्रामस्थांकडून अनेक वर्षांपासून नवीन पूल बांधण्याची मागणी होती. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून ही समस्या मार्गी लागली असून, तेथील नागरिकांची पावसाळ्यातील जीवघेण्या प्रवासातून सुटका होणार आहे. याबद्दल उमरोलीतील नागरिकांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले आहेत.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply