लॉकडाऊनचे अखेरचे काही दिवस म्हणजे पुन्हा एकदा तीच चर्चा. लॉकडाऊन वाढवला जाणार की त्याला पूर्णविराम मिळणार? यापूर्वीच्या तिन्ही लॉकडाऊनच्या अखेरीस हेच झाले आणि चौथा लॉकडाऊनही याला अपवाद नाही. पुन्हा तीच प्रतीक्षा, अंदाज, सरकारी चर्चांचा कानोसा आणि अखेरीस जे होईल त्याचा समजुतदार स्वीकार.
जगभरातील अनेक विकसित देशांनी कोरोनाचा फैलाव वेगाने वाढत असतानाही भारताइतका कठोर लॉकडाऊन पुकारला नाही. त्या सर्व देशांमध्ये कोरोना नुसता अफाट वेगाने पसरलाच नाही तर त्याच्या बळींची संख्याही तिथे भयावह होती. भारताने मात्र देशात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे चित्र स्पष्ट होताच अतिशय कठोर अशा लॉकडाऊनची अंमलबजावणी केली. विकसित देशांमध्ये कोरोना धडकी भरवणार्या वेगाने वाढत असताना, भारतासारख्या अफाट लोकसंख्येच्या आणि अपुर्या क्षमतेची आरोग्ययंत्रणा असलेल्या देशाचे कसे होणार अशी चिंता आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यक्त केली गेली होती. आताची भारतातील कोरोनाबाधितांची संख्या चिंता वाढवणारी वाटत असली तरी आजची ही संख्या सुरुवातीला भारतातील कोरोना प्रादुर्भावाविषयी जे अंदाज व्यक्त झाले होते त्यापेक्षा बरीच कमी आहे. याचाच अर्थ लॉकडाऊनमुळे भारताला कोरोना फैलावाचा वेग बराच नियंत्रित करता आला. केसेस वाढल्या पण लॉकडाऊन नसता तर त्या यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी, भयावह अशा रीतीने वाढल्या असत्या. त्यामुळेच भारतातील कोरोना साथीच्या व्यवस्थापनाचे यश हे लॉकडाऊनचे यश आहे हे अनेक स्तरांवर निर्विवादपणे मान्य केले गेले. हे यश आपल्याला मिळवून दिले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाने. आधी त्यांनी कठोर लॉकडाऊन पुकारून लोकांचे प्राण वाचवण्यावर भर दिला. पण कोरोनापासून बचावाइतकेच उपजीविका टिकवणेही महत्त्वाचे आहे हे अल्पावधीतच या दूरदृष्टीच्या नेतृत्वाच्या लक्षात आले. म्हणूनच लागलीच त्यांनी ‘जान भी जहान भी’ अशी घोषणा दिली. लॉकडाऊनमधून कोरोनापासून बचाव साध्य होत असला तरी आपण सारेच असे लॉकडाऊनमध्ये जगत राहू शकत नाही याची जाणीवही या समाजाभिमुख, संवेदनशील नेतृत्वाला होतीच. अनेकांची रोजीरोटी, धंदेव्यवसाय लॉकडाऊनमुळे पुरते बुडाले आहेत. त्यामुळे हळूहळू लॉकडाऊन शिथिल करत चौथ्या लॉकडाऊनमध्ये रेड झोन नसलेल्या भागांमध्ये जनजीवन बर्यापैकी पूर्ववत करण्यावर भर देण्यात आला. आपापल्या मूळ राज्यात परतू इच्छिणार्या स्थलांतरित मजुरांना विशेष श्रमिक गाड्यांमधून प्रचंड संख्येने त्यांच्या मूळ घरी पोहोचवण्यात आले. या आठवड्यात तर देशांतर्गत विमानसेवा देखील सुरू झाली. कोरोनासोबत जगायला शिकायचे हा सूर एव्हाना अधिक गडद होऊ लागला आहे. हे कोरोनासोबत जगायचे म्हणजे नेमके काय हे येत्या काळात हलकेहलके अधिकाधिक स्पष्ट होत जाईल. चौथा लॉकडाऊन संपत आला आहे. गुरूवारीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लॉकडाऊन वाढवण्यासंबंधातील त्यांची मते जाणून घेतली. तसेच कोणत्या क्षेत्रांमध्ये निर्बंध खुले व्हावेत, असे राज्यांना वाटते तेही शाह यांनी जाणून घेतले आहे. यापूर्वी कायम ही चर्चा थेट स्वत: मोदीजींनी केली होती. बहुतेक मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्यास अनुकूलता दर्शवली आहे. परंतु आर्थिक व्यवहार हळूहळू सुरू करून जनजीवन पूर्ववत करण्याच्या दिशेने वाटचाल करायला हवी असेही अनेकांना वाटते. याचाच अर्थ कोरोनासोबत जगण्याचा सुवर्णमध्य आता आपल्याला गाठायचा आहे.