खारघर : रामप्रहर वृत्त
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 137वी जयंती देशभरात लॉकडाऊनचे पालन करीत उत्साहात साजरी केली गेली या निमित्ताने गुरुवारी (दि. 28) भारत रक्षा मंचने महाराष्ट्रात विविध कार्यक्रम आयोजित केले होते. मंचच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष बीना जयेश गोगरी यांच्या पुढाकाराने एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला ज्याला मुंबई, नवी मुंबई आणि रायगडमधून उत्तम प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात लहानगे आणि किशोर व किशोरींनी सहभाग घेतला होता. यात वय वर्ष सात ते 19 या वयोगटातील 30हून अधिक मुला-मुलींनी त्यांचा मनातील स्वातंत्र्यवरीर सावरकरांबद्दलचा आदर स्वतःचे व्हिडीओ बनवून व्यक्त करीत ते व्हिडिओ भारत रक्षा मांचाला पाठवले जे भारत रक्षा मंचाच्या फेसबुक पेजवरून प्रकाशित केले गेले. बीना गोगरी म्हणाल्या, या उपक्रमातून आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सर्वच स्वातंत्र्य सैनिकांना पुढील पिढीत जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहोत. मंचचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रणजीत सांगळे म्हणाले की, सावरकरांचा त्याग आणि तपस्या हीच भारताच्या अखंडतेला आणि ऐक्याला अबाधित ठेवू शकते आणि त्याचाच प्रयत्न मंचने केला आहे. भविष्यातदेखील असे उपक्रम राबवून मंच एक राष्ट्रप्रेमी नागरिकांची फळी भविष्याकरिता उभी करण्यासाठी कटिबद्ध आहे. मंचचे पश्चिम मध्य क्षेत्राचे संघटन मंत्री प्रशांत कोतवाल म्हणाले की, भारताच्या इतर महापुरुषांचे देखील स्मरण व्हावे, नव्हे तर त्यांची चेतना नवीन पिढीला लाभावी म्हणून याच प्रकारचे कार्यक्रम मंच भविष्यातदेखील राबवत राहील. भारत रक्षा मंचतर्फे डिजिटल सावरकर जयंती उत्सवात सहभागी झालेल्या सर्व मुलांना डिजिटल सर्टिफिकेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.