नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबईत शुक्रवारी (दि. 29) एकाच दिवशी 277 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना रुग्णांचा दररोजचा आकडा वाढत असताना नवी मुंबईकरांसाठी रुग्ण कोरोनामुक्त होणे ही आनंदाची बाब पुढे आली आहे. आतापर्यंत बरे झालेल्या व्यक्तींचा आकडा हजारपार पोहोचला आहे.
नवी मुंबईमध्ये शुक्रवारी 65 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले, तर तीन जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महानगरपालिका कोरोनाबधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहे. त्यामुळे एकूण कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा एक हजार 158 झाला आहे.
शुक्रवारी 65 रुग्ण आढळल्याने बाधितांची एकूण संख्या एक हजार 996 झाली आहे. सद्यस्थितीत 775 बाधित उपचार घेत आहेत. दिवसभरातील बधितांची विभागवार आकडेवारी कोपरखैरणे 14, ऐरोली 13, तुर्भे 11, बेलापूर 10, दिघा 7, नेरूळ सहा, वाशी व घणसोली प्रत्येकी दोन अशी आहे. तुर्भे विभागात दररोज आकडा वाढत असताना शुक्रवारी ही संख्या काहीशी आटोक्यात आलेली दिसून आली.
कोरोनावर मात करण्यासाठी सारेच प्रयत्न करीत आहेत. प्रशासन, पोलीस, वैद्यकीय क्षेत्रातील लोक कोविड योद्धे बनून रात्रंदिवस आपली सेवा चोखपणे बजावत आहेत, परंतु तरीही काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडून स्वत:सह कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालताना दिसत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता प्रत्येकाने काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
Check Also
संत रोहिदास महाराज जयंती भाजपतर्फे विविध कार्यक्रमांनी होणार साजरी
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तसंत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त …
RamPrahar – The Panvel Daily Paper