महाराष्ट्रासमोर एक नव्हे तर दोन संकटे आताच्या घडीला आ वासून उभी आहेत. कोरोनाच्या संकटाशी महाराष्ट्र लढा देतोच आहे. त्यातच आता निसर्ग चक्रीवादळ पुढ्यात येऊन ठाकले आहे. अलिबाग परिसरात हे वादळ धडकण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात विशेष खबरदारीची गरज आहे.
साधारण मंगळवार दुपारपासूनच हवेचा रंग पालटला. ढगाळलेल्या हवेपाठोपाठ तासाभरातच पाऊसही सुरू झाला आणि येऊ घातलेल्या चक्रीवादळाची चाहूल सगळ्यांनाच लागली. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राने चक्रीवादळाचे रूप धारण केल्याची वर्दी हवामान खात्याने दिली. रायगड जिल्ह्याला या चक्रीवादळासंदर्भात विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. चक्रीवादळ अलिबागनजीक धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या बारा तासांमध्ये चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढून ठाणे, पालघर, मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चक्रीवादळादरम्यान वार्याचा वेग 100 ते 120 किमी प्रति तास इतका तीव्र असेल. त्यामुळेच किनारपट्टी परिसरात लोकांना दोन दिवस घरातच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्नपदार्थांचा पुरेसा साठा सोबत ठेवणे, महत्त्वाची कागदपत्रे व मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवणे, अत्यावश्यक वस्तू एकत्र ठेवणे आदी सूचनांचे पालन केल्यास आपत्कालीन स्थितीत मदत होऊ शकेल. नुकसान टाळण्यासाठी वादळाच्या काळात वीजेची उपकरणे बंद ठेवण्याची सूचनाही करण्यात आली आहे. कोरोनाच्या फैलावाच्या भीतीने एकीकडे सोशल डिस्टन्सिंग पाळावे लागणार आहेच. ती खबरदारी घेऊनच धोका असलेल्या भागातील जनतेला सुरक्षित ठिकाणी हलवावे लागेल वा अन्नपाण्याचा पुरवठा करावा लागेल. अर्थात चक्रीवादळाची शक्यता बरीच आधी वर्तवण्यात आल्यामुळे प्रशासनाला खबरदारीची उपाययोजना करण्यास पुरेसा कालावधी मिळाला आहे. कोरोनामुळे पोलीस दलांवर आधीच कामाचा ताण आहे. त्यात आता चक्रीवादळाच्या अनुषंगाने करावे लागणारे आपत्कालीन व्यवस्थापन त्यांच्या ताणात मोठीच भर घालणारे ठरेल. चक्रीवादळामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीला सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरूवातही झाली आहे. कोरोनाबाधितांच्या वेगाने वाढणार्या संख्येमुळे मुंबई व मुंबई महानगर प्रदेशातील लोक आधीच तणावग्रस्त अवस्थेत आहेत. त्यात आता चक्रीवादळामुळे त्यांना दोन दिवसांच्या गरजेच्या वस्तू खरेदी करण्यापासून इतरही खबरदारी घ्यावी लागली आहे. राज्य सरकारने निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदीचे कलम 144 लागू केले आहे. सार्वजनिक ठिकाणे, समुद्रकिनारे व निरनिराळी उद्याने यांचा जमावबंदीसंदर्भात विशेष उल्लेख करण्यात आला आहे. ही ठिकाणे अशीही कोरोनामुळे ओसच पडली होती. कोरोनामुळे लोक आधीच भयग्रस्त झाले आहेत. त्यामुळे या चक्रीवादळाच्या काळात त्यांना मानसिकदृष्ट्या सावरण्याची विशेष गरज आहे. विविध माध्यमांवरून लोकांना सतत सुयोग्य पद्धतीने माहिती देत राहिल्यास ही भीती थोडी कमी होईल. घबराटीतून संकटात भरच पडू शकेल. त्यामुळे ते टाळण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. व्हॉट्सअॅप वा अन्य समाजमाध्यमांवरून कोणत्याही स्वरुपाच्या अफवा पसरू नयेत याचीही खबरदारी घ्यायला हवी. मात्र, लोकांचा परस्परांशी असलेला संपर्क वादळाच्या काळात कायम राहायला हवा. लोकांनीही या काळात समाजमाध्यमांचा वापर अतिशय जबाबदारीने करायला हवा. एकमेकांना आधार देऊन, गरज पडल्यास मदतीचा हात देऊन हिंमत आणि धैर्याने संकटाचा हा काळ ओलांडण्याची गरज आहे.