पनवेल : रामप्रहर वृत्त
गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे दानशूर व्यक्तिमत्त्व आणि सतत माणसांमध्ये रमणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर सध्याच्या कोरोनाच्या अभूतपूर्व संकटकाळातही जनसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (दि. 2) सर्वत्र फिजिकल डिस्टन्स नियमांचे पालन करून नागरिकांसाठी विविध आरोग्यदायी आणि सामाजिक उपक्रम झाले. वाढदिवसाचे औचित्य साधून तब्बल 1 लाख 10 हजार मास्कचे मोफत वाटप, रक्तदान शिबिरे, रोगप्रतिकारकशक्ती वाढविणार्या अर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर अनेक ठिकाणी अन्नधान्य, भोजन व फळे वाटप, तसेच स्वच्छता मोहीमही राबविण्यात आली. यात त्या त्या विभागातील स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन उपक्रम यशस्वी केले. या लोकोपयोगी उपक्रमांना उत्तम प्रतिसाद लाभला.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पनवेल परिसरातील किमान 80 हजार नागरिकांना मास्क व रोगप्रतिकारक गोळ्या देण्याचा उद्देश ठेवण्यात आला होता. प्रत्यक्षात श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून तब्बल 1 लाख 10 हजार मास्कचे मोफत वाटप करण्यात आले. त्याचबरोबर रोगप्रतिकारक गोळ्यांच्या 1 लाख 20 हजार बाटल्यांचे वाटप भाजप लोकप्रतिनिधींच्या वतीने करण्यात आले. मास्क व रोगप्रतिकारक गोळ्यांचे वाटप स्थानिक लोकप्रतिनिधींनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सोबतीने आपापल्या प्रभागात व विभागात नागरिकांना केले.
कोरोना महामारीच्या काळात अनेक हॉस्पिटलमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्ताची ही तूट भरून काढण्यासाठी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या माध्यमातून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल, नवीन पनवेल, कर्जत, उरण, खारघर, सुकापूर आदी ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली होती. नवीन पनवेल प्रभाग क्रमांक 16 व भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहर यांच्या वतीने नवीन पनवेल येथील कर्नाटक संघ हॉलमध्ये झालेल्या शिबिरात 77 रक्तदात्यांनी, पनवेल तालुका भारतीय युवा मोर्चा व धन्वंतरी आरोग्यदूत सेवा संस्था यांच्या वतीने सुकापूर येथील लक्ष्मी पब्लिक स्कूल येथे झालेल्या शिबिरात 73 रक्तदात्यांनी रक्तदान केले. पनवेल येथे भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात प्रभाग क्रमांक 14, 18 व 19च्या वतीने झालेल्या शिबिरात 51 रक्तदात्यांनी, खारघर येथे झालेल्या शिबिरात 20 रक्तदात्यांनी, भारतीय युवा मोर्चा कर्जत मंडलच्या वतीने श्री कपालेश्वर मंदिर येथे घेण्यात आलेल्या शिबिरात 34 रक्तदात्यांनी, साई ब्लड बँक येथे झालेल्या शिबिरात 11 रक्तदात्यांनी, खांदा कॉलनी येथील रोटरी ब्लड बँकेत 25 रक्तदात्यांनी, खांदा कॉलनी येथील शिबिरात 34 जणांनी तसेच दोन दिवसांपूर्वी उरण युवा मोर्चाच्या वतीने घेण्यात आलेल्या शिबिरात 101 जणांनी अशा एकूण 426 रक्तदात्यांनी रक्तदान करून या शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
गेली अनेक वर्षे जनतेच्या लहान-मोठ्या प्रश्नांकडे बारकाईने आणि जातीने लक्ष देणारे लोकनेते रामशेठ ठाकूर या जागतिक संकटातही गोरगरीब जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. लॉकडाऊन पुकारण्यात आल्यानंतर हातावर पोट असलेल्या अनेकांची उपजीविका अडचणीत आली. अशा वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रेरणेने आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर व त्यांच्या सहकार्यांनी 82 हजारांहून अधिक नागरिकांना अन्नधान्याचे घरपोच वाटप केले. त्याचबरोबर मोलमजुरी तसेच हातावर पोट असलेल्या गरजूंना मोदी भोजन कम्युनिटी किचनच्या माध्यमातून 1 लाख 25 हजारांहून अधिक तयार जेवणाच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले. या सर्व उपक्रमांत लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन मोलाचे ठरले. याखेरीज अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप असो वा मास्कचे वाटप लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्यांची कोरोनासंबंधित हरएक गरज भागवण्याचा प्रयत्न अव्याहतपणे सुरू आहे. या उपक्रमांत सहभाग नोंदविल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.
अभीष्टचिंतनपर शुभेच्छांचा वर्षाव
कुणीही गरजू लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या समोरून रिक्त हस्ते परतत नाही. कोरोनाच्या या अभूतपूर्व संकटकाळातही लोकनेते रामशेठ ठाकूर शक्य तितक्या अधिकाधिक लोकांपर्यंत सर्व प्रकारची मदत पोहोचवण्याचा प्रयास करीत आहेत. एखाद्या आधारवडासारखे ते जनतेच्या पाठीशी उभे आहेत. सध्याच्या कोरोना संकटामुळे आपल्या वाढदिवसाचा सोहळा न करण्याचे आवाहन त्यांनी केले आणि वाढदिवस घरगुती तेही साध्या पद्धतीने साजरा झाला, परंतु समाजाची गरज लक्षात घेऊन मास्क, रोगप्रतिकारकशक्ती वाढविणार्या गोळ्या, अन्नधान्य वाटप, रक्तदान शिबिरे असे आरोग्यदायी उपक्रम तसेच सामाजिक उपक्रमही होऊन नेहमीप्रमाणे लोकोपयोगी वाढदिवस साजरा झाला. सामजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, पत्रकारिता, साहित्यिक, लेखक, विविध क्षेत्रांतील मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, सामजिक संस्था व संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक अशा हजारो जणांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दूरध्वनी तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देऊन अभीष्टचिंतन केले.
Check Also
शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …