Breaking News

निसर्ग चक्रीवादळाचे तांडव; सुधागडात हाहाकार

पाली ः प्रतिनिधी

कोरोनासारख्या  महाभयंकर राष्ट्रीय  संकटाच्या जोडीला आलेल्या दुसर्‍या निसर्ग चक्रीवादळाच्या अक्राळविक्राळ संकटाने सुधागडसह सबंध रायगड जिल्ह्याला हादरवून टाकले आहे. बघता बघता होत्याचे नव्हते झाले. सुधागड तालुक्यात कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्याने नागरिक भयभीत झाले असताना निसर्गाचे तांडव काय असते तसेच वार्‍याचा वेग आणि चक्रीवादळ सार्‍यांनीच प्रथमच अनुभवले.

हे कोकण किनारपट्टीवरील शतकातील सर्वात मोठे वादळ असल्याचे जाणकारांनी म्हटले आहे. चक्रीवादळाच्या तडाख्यात सुधागड तालुक्यातील शेकडो गावे आदिवासी वाड्यापाड्यांना मोठा फटका बसला. तसेच शिहू बेणसे विभागातदेखील

चक्रीवादळाचे रौद्र रूप पाहावयास मिळाले. येथील अनेकांच्या घराचे छप्पर उडाले मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली. पावसाळा तोंडावर आल्याने घरात साठवून ठेवलेले अन्नधान्य भिजले. दैनंदिन वापराचे साहित्य तसेच जीवनावश्यक वस्तूदेखील उद्ध्वस्त झाल्या. अनेकांनी रात्र जागून काढली. घरात पाणी साचल्याने मोठे संकट ओढवले. अशात बाजारात पत्रे व कौले उपलब्ध नसल्याने हे संकट अधिकच गडद झाले. सर्वत्र पत्र्यांचा सडा पडला. याहून अधिक वेदनादायी परिस्थिती म्हणजे वर्षानुवर्षे ज्या वृक्षांनी गोड फळे दिली, सावली दिली ती वृक्ष उन्मळून पडली.

महामार्गावरदेखील मोठमोठे वृक्ष कोसळल्याने वाहतूक अनेक तास ठप्प राहिली. चक्रीवादळाचे भय अजूनही मनात घट्ट असून नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. डोळ्यांदेखत झालेले नुकसान पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. सरकारने अशा वेळी भरपाई द्यावी, अशी मागणी  सर्वत्र जोर धरत आहे. नागोठणे वसाहतीत रस्त्यावर वृक्षांचा जणू सडा पडला. जेसीबीच्या सहाय्याने वृक्ष हटविण्याचे काम सुरू आहे.

अशातच या ठिकाणी मोटरसायकल व सायकलवर झाड कोसळल्याने दोन्हींचा चक्काचूर झाला. ठिकठिकाणी विद्युत खांब व वाहिन्या कोसळल्या. त्यामुळे वीजपुरवठा 48 तासांहून अधिक काळ खंडित झाला. ग्रामीण व शहरी भागातदेखील अंधाराचे सावट आहे. वीजपुरवठा कधी पूर्ववत होईल याचा नेम नाही. अशातच वीज वितरण अधिकारी व कर्मचार्‍यांचे फोन नॉट रिचेबल असल्याने परिस्थिती कधी पूर्ववत होईल याचा नेमका अंदाज वर्तविणे कठीण झाले आहे. अनेक ठिकाणी विद्युत पुरवठ्यावर पाणीपुरवठा अवलंबून असल्याने पाण्यासाठीही लोकांची भटकंती सुरू झाली. दरम्यान, बेणसे ग्रामपंचायतीच्या वतीने नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करून योग्य ती नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासित केले. सुधागड तालुक्याचे तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी चक्रीवादळानंतर उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी करून नागरिकांना प्रशासनाकडून अधिकाधिक सहकार्य व मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply