Breaking News

माथेरान आऊट ऑफ रेंज; वीज आणि दूरध्वनी ठप्प

कर्जत ः बातमीदार

पर्यटन व्यवसाय बंद असलेल्या माथेरान या पर्यटनस्थळी राहणारे नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यात निसर्ग वादळाने माथेरानकरांवरील संकटात आणखीनच भर घातली असून 3 जूनच्या दुपारपासून माथेरान आऊट ऑफ रेंजमध्ये गेले आहे. दरम्यान, शेकडो झाडे तुटल्याने माथेरानला होणारा वीजपुरवठा खंडित आहे, तर माथेरानमधील दूरध्वनी व्यवस्थादेखील बंद पडली आहे. घाटरस्तादेखील झाडे रस्त्यावर पडल्याने बंद आहे. त्यामुळे माथेरानमधील नागरिकांचा जगाशी असलेला संपर्क तुटला आहे. अशीच परिस्थिती 2005मधील पावसाळ्यात झाली होती.

    निसर्ग चक्रीवादळामुळे डोंगरावर वसलेल्या आणि पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. माथेरानमध्ये वादळात शेकडो झाडे उन्मळून पडली असून त्याचवेळी काही झाडे घरांवर पडली. त्या घरांचे नुकसान झाले आहे. 3 जून रोजी दुपारी आलेल्या चक्रीवादळाने माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. माथेरान गावात जागोजागी झाडे कोसळली असून त्यामुळे रस्त्याने चालणेदेखील कठीण होऊन बसले आहे. त्यात झाडेही घरांवर कोसळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. माथेरानमध्ये प्रवेश करण्यासाठी असलेल्या दस्तुरी नाक्यापासून शेवटचे टोक असलेल्या वन ट्री हिलपर्यंत सर्व भागात झाडे कोसळली आहेत. शहरातील सर्व रस्त्यांवर झाडे असून किमाम 10 हजार झाडे निसर्ग चक्रीवादळात तुटून गेली आहेत, तर काही जमिनीपासून मुळासकट कोसळली आहेत.

                       माथेरानमध्ये जाणारा एकमेव मार्ग असलेल्या नेरळ-माथेरान घाट रस्त्यात वॉटर पाईपपासून दस्तुरी नाकापर्यंतच्या रस्त्यावर सर्व भागात मोठ्या प्रमाणात झाडे कोसळल्याने घाटरस्ता बंद होता, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने घाटरस्त्यातील झाडे जेसीबी मशीनच्या साहाय्याने बाजूला केली असून आता घाटरस्ता मोकळा झाला आहे, परंतु माथेरान गावातील सर्व रस्त्यांवर पडलेली झाडे ही बाजूला करण्यासाठी कोणत्याही मशीनचे साहाय्य घेतले जाणार नसल्याने माथेरान गिरीस्थान नगर परिषद यांच्याकडे असलेल्या आरोग्य विभागाच्या सफाई कर्मचार्‍यांना पालिकेने रस्त्यावरील झाडे बाजूला करण्यासाठी कामाला लावले आहे. नगर परिषद प्रशासनाने 90 कामगार झाडे बाजूला करण्यास लावले असून शासनाने विशेष बाब म्हणून जेसीबी मशीन माथेरानमध्ये नेण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी कर्जतच्या प्रांत अधिकारी वैशाली परदेशी यांच्याकडे केली आहे.

                        शहरात सर्वत्र झाडे आणि झाडांच्या फांद्या पडलेल्या असल्याने वीजपुरवठादेखील खंडित झाला. माथेरानमधील वीजपुरवठा करणार्‍या वाहिन्या या भूमिगत असल्याने वीज वाहिन्यांचे नुकसान झाले नाही, परंतु शहरातील 15 घरांची पत्रे उडून गेली आहेत, तर 17 घरांवर, इमारतींवर पाणी साठवून ठेवण्यासाठी आलेल्या सिंटेक्स टाक्या खाली कोसळून त्यांचे नुकसान झाले. वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरातील दूरध्वनी व्यवस्थादेखील कोलमडून गेली.

दुपारपासून वीज आणि दूरध्वनी व्यवस्था बंद असून त्यामुळे माथेरानचा जगाशी संपर्क तुटला आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने शहरात पाणीपुरवठादेखील होऊ शकला नाही.                         महावितरण कंपनीने आपली सर्व यंत्रणा वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी लावली असून चार वाजता म्हणजे 26 तासांनी माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाका येथील वीजपुरवठा सुरळीत झाला. रात्री  उशिरापर्यंत शहरातील वीजपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती महावितरणचे शाखा अभियंता लोभी यांनी दिली आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply