Breaking News

मराठा समाज नेते मनोज जरांगे-पाटील शिवरायांच्या समाधीस्थळी नतमस्तक

महाड ः प्रतिनिधी
किल्ले रायगडावर ऊर्जा मिळते, ती इतरत्र कुठे मिळत नाही. येथील ऊर्जा घेऊन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन पुढे लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे मराठा समाज नेते मनोज जरांगे-पाटील यांनी मंगळवारी (दि.30) स्पष्ट केले.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखो मोर्चेकर्‍यांसह मुंबईच्या दिशेने निघालेले जरांगे-पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीला यश आल्यानंतर ते प्रथमच रायगड किल्ल्यावरील शिवरायांच्या समाधीला नतमस्तक होण्यासाठी येथे आले होते. त्या वेळी त्यांनी आपली भूमिका मांडली. रायगड किल्ल्यावर चित्त दरवाजामार्गे पायी जाण्याचा निर्धार हजारो कार्यकर्त्यांसह घेऊन रायगडावर आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, इथली ऊर्जा घेऊनच मी विजय संपादन केला आहे. ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडत नाहीत त्यांच्यासाठी सगेसोयरे असा कायद्याचा अध्यादेश पारित झाला. त्यामुळे यापुढे आरक्षणाविना एकही मराठा उपेक्षित राहणार नाही. रायगडापेक्षा मोठे दैवत कुठलेच नाही. येथे शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन, त्यांचा आशीर्वाद घेऊन व रायगडची माती कपाळाला लावून मराठा आरक्षणासंदर्भातील लढाई चालू राहील.
रायगडावरील शिवरायांच्या समाधीला नतमस्तक होण्यासाठी मनोज जरांगे-पाटील यांच्यासमवेत मराठा आरक्षण चळवळीतील अनेक कार्यकर्ते आणि सकल मराठा समाजातील महाड, रायगडसह राज्याच्या विविध भागातून नेते, नागरिक हजर होते.

Check Also

कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड

जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …

Leave a Reply