न्याय मिळवून देण्याची ग्वाही
खोपोली : प्रतिनिधी
कोपरान कंपनीच्या व्यवस्थापनाने तडकाफडकी कामावरुन काढल्याच्या निर्णयाविरोधात खालापूर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात 25 जानेवारीपासून आमरण उपोषणाला बसलेल्या दिपाली लोणकर यांची रायगड जिल्हा भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा अश्विनी पाटील यांनी शनिवारी (दि. 30) भेट देऊन त्यांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली.
दोनच दिवसांपूर्वी भाजप महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनीही लोणकर यांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याची ग्वाही आहे. त्यासाठी त्यांनीही संबंधीत शासकीय खात्यांशी संपर्कही साधला होता.
दिपाली लोणकर खालापूर तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर 25 जानेवारीपासून उपोषणास बसल्या आहेत, याबाबत संबंधीत खात्याने व कंपनी व्यवस्थापनाने साधी दखलही न घेतल्याबद्दल जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील व किसान मोर्चाचे सुनिल गोगटे यांनी नाराजी व्यक्त केली. शनिवारी भाजपच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तहसीलदार व नायब तहसीलदार कार्यालयात उपलब्ध नसल्याबद्दल उभयतांनी भाषणात निषेध व्यक्त केला.
त्यानंतर भाजप शिष्टमंडळाने पोलीस उपअधीक्षक शुक्ल यांची भेट घेवून या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी विनंती केली. या शिष्टमंडळात भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील, किसान मोर्चाचे सुनील गोगटे, कर्जत तालुकाध्यक्षा स्नेहा गोगटे, कर्जतच्या नगरसेविका स्वामिनी मांजरेकर, भाजपचे खोपोली शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, महिला मोर्चा शहराध्यक्षा शोभा काटे, स्नेहल देशमुख, भाजप कामगार आघाडीचे सूर्यकांत देशमुख व स्थानिक भाजप पदाधिकारी यांचा समावेश होता.