पनवेल तालुक्यामध्ये 53 नवीन रुग्ण
दोघांचा मृत्यू; तर 24 जण कोरोनामुक्त
पनवेल : प्रतिनिधी -पनवेल तालुक्यात शनिवारी (दि. 13) कोरोनाच्या 53 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच 24 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत 37 नवे रुग्ण आढळले असून 22 रूग्ण बरे झाले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 16 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. तर दोन रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
महापालिका हद्दीत तळोजा पानाचंद येथील एका आणि खारघर शांतिकुंज सोसायटीतील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात कामोठे सहा, खारघर 15, कळंबोली चार, नवीन पनवेल पाच, तळोजा तीन आणि पनवेल मध्ये चार रुग्ण आढळले आहेत. पनवेल ग्रामीणमधील आढळलेल्या रुग्णांमध्ये अजीवली येथे दोन, भोकरपाडा येथे तीन, सुकापूरमध्ये दोन आणि उसर्ली, नेरे, करंजाडे, देवद, उलवे येथे प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. उलवे आणि शिरढोण येथील रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
महापालिका क्षेत्रात कळंबोलीमध्ये सेक्टर 2 ई मधील एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींचा समावेश आहे. कामोठे येथील सहा रुग्णांमध्ये नर्सचा समावेश आहे. खारघरमध्ये ओंकार हाईट्स मधील एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती, घरकुल सोसायटीतील तीन व्यक्ती आणि शांतिकुंज सोसायटीतील सहा व्यक्तींचा समावेश आहे. नवीन पनवेलमध्ये ए टाइप मधील एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती आणि सेक्टर 17 पीएल-5 मधील एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींचा समावेश आहे. पनवेलमध्ये नर्मदा कॉम्प्लेक्स, नंदनवन सोसायटी, तक्का लावेरिया सोसायटी आणि जुना ठाणा रोड वरील रत्नदीप सोसायटीतील एका व्यक्तींला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तळोजामध्ये तळोजा पानाचंद घर नं. 266 मधील एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींचा समावेश आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 928 रुग्ण झाले असून 638 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 68.75 टक्के आहे. 251 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाला आहे.
उरणमध्ये दोन नव्या रुग्णांची भर
उरण : वार्ताहर – उरण तालुक्यात शनिवारी (दि.13) कोरोनाचे दोन नवीन पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. त्यात पुनाडे येथील 15 वर्षीय स्त्री व नागाव 35 वर्षीय पुरुष यांना कोरोनाची लागण झाली आहे.
उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 179 झाली आहे. त्यातील 159 बरे झालेले असून त्यांना डिस्चार्च देण्यात आला आहे. फक्त 19 रुग्ण उपचार घेत आहेत. व आतापर्यंत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. करंजा येथील 134 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले होते. त्यातील 131 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. करंजाचे फक्त तीन रुग्ण उपचार घेत आहेत, अशी महिती उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
नवी मुंबईत पाच कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
दिवसभरात 191 नव्या रुग्णांची नोंद
नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत शनिवारी (दि. 13) पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या 114 झाली आहे. तर दिवसभरात 191 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नवी मुंबईत रुग्णांची संख्या तीन हजार 734 झाली आहे. तसेच 62 जण बरे होऊन परतल्याने बरे झालेल्यांची एकूण संख्या दोन हजार 186 झाली आहे.
सध्या नवी मुंबईतील पालिका तसेच विविध खासगी रुग्णालयांत सद्यस्थितीत एक हजार 434 रुग्ण उपचार घेत आहेत. शनिवारी बाधितांची विभागवार आकडेवारी पाहिल्यास बेलापूर 17, नेरुळ 41, वाशी 11, तुर्भे 24, कोपरखैरणे 21, घणसोली 18, ऐरोली 46, दिघा 13 असा विभागवार रुग्णांचा समावेश आहे. तर दुसरीकडे नेरुळमध्ये एकाच दिवशी 41 व ऐरोलीत 46 रुग्ण सापडल्याने 191 पैकी 87 रुग्ण या दिन विभागात सापडले आहेत. त्यामुळे कधी नव्हते ते नेरुळ व ऐरोलीत चिंता वाढली आहे.
कर्जतमध्ये एकाचा मृत्यू; आणखी एकाला बाधा
कर्जत : बातमीदार – कर्जत तालुक्यात दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. त्यात शनिवारी (दि. 13) कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागात काम करणार्या पोशिर गावातील कर्मचार्याला कोरोना झाला असून त्यांना बदलापूरमधील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर वैजनाथ येथील महिला रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर पोशिर हे गाव असून तेथील 32 वर्षीय तरुण कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने तत्काळ कोविड रुग्णालयात दाखल केले. त्याच्या संपर्कात आलेले त्याचे आई वडील आणि पत्नी यांची कोरोना टेस्ट घेण्यासाठी कर्जत येथे नेण्याचे नियोजन केले आहे. तर तालुक्यातील वैजनाथ येथील 31 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलेचे पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असताना निधन झाले. त्यामुळे मयत झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या चार इतकी झाली आहे. सध्या तालुक्यात कोरोनाचे 36 रुग्ण असून त्यातील 24 रुग्णांनी कोरोना वर यशस्वी मात केली आहे. तर आठ रुग्ण उपचार घेत आहेत.